लातूर/ शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूच्या अवैध वाहतुकीविरुद्ध सुरू आहे. या मोहिमेत शिरूर अनंतपाळ पोलिसांनी गुटख्याची कार आडवताच चालक अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. या कारवाईत एक कारसह ११ लाख ७८ हजार १०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर अनंतपाळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कर्नाटक राज्यातून अहमदपूरच्या दिशेने सिल्व्हर रंगाच्या एमएच २४ एएस ४६२८ क्रमांकाच्या कारमधून प्रतिबंधित गुटखा आणला जात असताना पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांचे मार्गदर्शनात पोलिसांनी सापळा रचून दि. २ जुलै रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास तळेगाव (दे.) येथे पोलिसांनी वाहन अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन जागेवरच सोडून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. तपासादरम्यान वाहनातील कागदपत्रांच्या आधारे सय्यद मोजम आजम व इब्राहिम तांबोळी, दोघेही रा. अहमदपूर, जि. लातूर, यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रायबोळे करीत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
















