शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
तालुक्यातील अंकुलगा सय्यद परिसरात तुटलेल्या वीजवाहिनीच्या तारेच्या स्पर्शाने दोन हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या जीर्ण वीजवाहिन्यांबाबत नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
माहितीनुसार परिसरातील एका शेतालगत वीजवाहिनीची तार तुटून जमिनीवर पडली होती. तारेमध्ये वीजप्रवाह सुरू असल्याने त्या भागातून जाणा-या दोन हरणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व संबंधित यंत्रणेस याची माहिती दिली. परिसरातील अनेक वीजवाहिन्या जीर्ण झाल्याने तारा वारंवार तुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतक-यांसह नागरिक, पाळीव जनावरे आणि वन्यजीवांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात अशा घटनांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
या घटनेची गंभीर दखल घेऊन महावितरणने जीर्ण वीजवाहिन्या बदलाव्यात, धोकादायक ठिकाणी त्वरित दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत आणि नियमित देखभाल करून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी शेतकरी सैदोद्दीन सय्यद व ग्रामस्थांनी केली आहे.
















