लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील खंडापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहात कोट्यवधी रूपयाच्या देणग्या गोळा करून हिशेब न देताच पलायन केलेल्या तथाकथित किशोर महाराज जाधव याच्यावर अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. लातुरात भ्रष्टाचार विरोधी वारकरी संपद्राय कृती समितीने सतत पाठपुरावा करून ते धसास लावले आहे. कृती समितीने नुकतेच त्यासाठी २ दिवसांचे उपोषण केले. या आंदोलनाला अखेर यश आले असून या कथित महाराजाला पोलिसांनी आता त्वरित अटक करून लाखो भाविकांना न्याय मिळवून द्यावा, अशी कृती समितीची मागणी आहे.
खंडापूर येथे यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडलेल्या मराठवाड्यातील संतांच्या भव्य उत्सव सोहळ्यात जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीच्या गैरव्यवहार प्रकरणी तथाकथित महाराज, उत्सवाचा मुख्य आयोजक किशोर धोंडीराम जाधव (शिवणीकर), त्याचा कथित सहकारी सोनवणे (अहिल्यानगर) व इतर काही सहका-यांविरुद्ध, अपहार आणि धमकीसंदर्भातील एम.आय. डी. सी. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाने वारकरी संप्रदायात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
















