संतोष देशमुख हत्या प्रकरणी दबाव, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पायउतार
१०० दिवसांतच सरकारवर नामुष्की
मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येत धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर व या क्रूर हत्येचे फोटो समोर आले. याचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. त्यामुळे अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा तत्काळ मंजूर करून त्यांना पदमुक्त केले. धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामा दिल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला तर मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्यानंतरच मुंडेंनी राजीनामा दिल्याचे आ. सुरेश धस यांनी सांगितले. दरम्यान, विरोधकांनी राजीनामा पुरेसा नाही, तर सहआरोपी करून चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी केली.
महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एवढे प्रचंड बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारचे १०० दिवस होण्यापूर्वीच एका मंत्र्याला गंभीर आरोपामुळे मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागण्याची नामुष्की आज आली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हेच मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच क्रूर हत्येचे फोटोही समोर आले. याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली. देशमुख कुटुंबीयांसह बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. तरीही मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची पाठराखण केली. परंतु क्रूर हत्येची छायाचित्रे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना ठोस भूमिका घेणे भाग पडले.
मंगळवारी सकाळी धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन राजीनामापत्र दिले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे आपला राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि पुढील कारवाई करता तो माननीय राज्यपाल महोदयांकडे पाठवलेला आहे, असे म्हटले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नैतिकतेच्या मुद्यावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे सांगताना याबाबत माध्यमांसोबत बोलण्याचे टाळले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी बोलले आणि त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. प्रारंभीपासूनच देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. मात्र धनंजय मुंडे यासाठी तयार नव्हते. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार यांनी घ्यावा, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर अखेर आज आपला राजीनामा दिला आणि राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला.
तंबी देताच राजीनाम्याचे पत्र
मुख्यमंत्र्यांनी काल स्वत: अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा करून राजीनामा देण्यास सांगितले होते. धनंजय मुंडे स्वत:हून राजीनामा देण्यास तयार नव्हते. पण राजीनामा न दिल्यास राज्यपालांना शिफारस करून मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतरच मुंडे यांनी राजीनामा दिल्याचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी सांगितले.
मुंडेंच्या ट्विटवरून संताप
तब्बल तीन महिने संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत होते. पण सर्व आरोप धुडकावून लावत धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याची मागणी फेटाळली होती. आज मात्र राजीनामा दिल्यानंतर त्यांनी समाजमाध्यमाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना सदसद्विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नाही. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट करीत म्हटले. यावरही विरोधकांनी आक्षेप घेतला.