छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
शहरातील वारकरी सेवा चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे ‘माझा एक लाडू पांडुरंगाला’ हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे. दर्शनासाठी गेलेल्या वारक-यांची सेवा करण्यासाठी त्यांना गूळ शेंगदाण्याचे लाडू दिले जातात. यंदा एका दिवसात एक लाख नऊ हजार लाडू तयार करण्यात आलेत. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना या लाडूंचे वाटप केले जाते. गेल्या १८ वर्षांपासून हा उपक्रम नित्यनियमाने घेतला जातो, यंदाही भक्तिभावाने भाविकांनी सहभाग घेतला.
दरम्यान, लाडक्या पांडुरंगाची सेवा करण्याची इच्छा प्रत्येक वारक-याच्या मनात असते, त्यात एकादशीच्या दिवशी पंढरपूरला जाऊन दर्शन घेणे म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच मानली जाते. मात्र प्रत्येकाला दर्शनासाठी जाणे शक्य होत नाही, अशा भक्तांकडून वारक-यांची म्हणजेच साक्षात पांडुरंगाची सेवा घडावी या उद्देशाने आगळावेगळा उपक्रम राबवला जातो.
गेल्या १८ वर्षांपासून शहरातील मनोज सुर्वे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या ‘वारकरी सेवा चॅरिटेबल फाऊंडेशन’तर्फे ‘एक लाडू लाडक्या पांडुरंगाला’ हा उपक्रम राबवला जातो, एकादशीच्या आठ दिवस आधी येणा-या रविवारी सर्व भक्त एका ठिकाणी येऊन लाडू बांधण्याचे काम करतात. जालना रस्त्यावरील पाटीदार भवन येथे २९ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास लाडू तयार करण्याचे काम सुरू केले. दोन हजार किलो शेंगदाणे, दोन हजार किलो गूळ, दोनशे किलो साजूक तूप वापरून दोन ते अडीच हजार महिलांनी एक लाख नऊ हजार लाडू बांधण्याची माहिती आयोजक मनोज सुर्वे यांनी दिली.