मुंबई : प्रतिनिधी
राज्यभरात सध्या होळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. उद्या होळी आणि त्याच्या दुस-या दिवशी धुलिवंदन आहे. त्यामुळे राज्यासह देशभरातील बाजारपेठांमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. अनेक जण होळीसाठी रंग खरेदी करत आहेत. परंतु होळीच्या निमित्ताने पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी होळी आणि रंगपंचमीच्या सणाला गालबोट लागू नये, यासाठी नियमावली जारी केली असून होळीच्या निमित्ताने अश्लिल गाणी लावली किंवा अनोळखी व्यक्तीवर रंग फेकल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. ही नियमावली १२ ते १८ मार्चपर्यंत जारी असणार आहे.
होळी सणाच्या दुस-या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. पण अनेकदा रंगपंचमी सादर करत असताना या सणाला गालबोट लागते. काही अनपेक्षित घटना या दिवशी घडतात. त्यामुळे अशा घटनांपासून सर्वसामान्य नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी मुंबई पोलिसांनी काही महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहे. पोलिसांनी जारी केलेल्या सूचना आणि नियमांचे पालन केले नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
होळी सण आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी आज नियमावली जारी केली. सध्या मुस्लिम समाजाचा रमजान महिना सुरू आहे. त्यामुळे पोलिसांकडून होळी आणि धुलिवंदनासाठी खबरदारी घेत काही महत्त्वाचे नियम जारी केले आहेत. त्यानुसार होळीच्या दिवशी किंवा धुलिवंदनाच्या दिवशीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवशी लाऊड स्पीकरवर गाणी लावली जातात. पण अशावेळी अश्लील गाणी लावण्यास बंदी आहे. अर्थात अश्लील गाणी लावणे हे अयोग्यच आहे. ते नैतिकतेत बसत नाही. पण तरीही अनेकांकडून अशा प्रकारचे विकृत कृत्य केले जाते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी अश्लील गाणी वाजवल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
धुलिवंदनाच्या दिवशी अनेकांकडून बेशिस्तपणे वागले जाते. काही जण रस्त्याने ये-जा करणा-या अनोळखी व्यक्तीवर रंग फेकतात, तसेच पाण्याचे फुगे किंवा पिशव्या फेकतात. यामुळे वाद होतो. त्यामुळे असे वाद टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. अनोळखी व्यक्तींवर रंग फेकल्यास कारवाई केली जाईल, असे मुंबई पोलिसांनी बजावले आहे.
तेढ निर्माण होईल
असे कृत्य नको
होळी आणि रंगपंचमी साजरी करत असताना समाजात तेढ निर्माण होईल, असे कृत्य करु नका, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे असे अनुचित प्रकार होणार नाहीत, याची पोलिस खबरदारी घेतील. परंतु त्यातून तसे प्रकार घडल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले.