अमरावती : प्रतिनिधी
अमरावतीत भरधाव रुग्णवाहिकेने धामणगाव तालुक्यातील देवगाव चौफुलीवर पोलिस उपनिरीक्षकांच्या कारला जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडल्याची घटना घडली. या भीषण अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची थरारक दृश्यं सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक राहुल वानखडे हे आपल्या पत्नी आणि ८ वर्षीय मुलीसह, तळेगाव येथे खासगी चारचाकी वाहनाने जात होते. या दरम्यान देवगाव चौफुलीवर धामणगाववरून यवतमाळकडे भरधाव वेगाने जाणा-या अॅम्ब्युलन्सने कारला जोरदार धडक दिली.
धडक एवढी जोरदार होती की त्यामध्ये पोलिस उप निरीक्षक राहुल वानखडे यांच्या कारचा चक्काचूर झाला. त्यामध्ये त्यांची ८ वर्षीय मुलगी त्रिशा राहुल वानखडे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वानखडे त्यांच्या पत्नी आणि ते स्वत: गंभीर जखमी असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत. तसेच रुग्णवाहिकेमध्ये कोणताही रुग्ण नसताना चालक भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे. रुग्णवाहिका चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

