22.3 C
Latur
Thursday, September 26, 2024
Homeसंपादकीयअमित शहांची दमबाजी!

अमित शहांची दमबाजी!

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहेत. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय गृहमंत्री मंगळवारी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी नागपूरमध्ये आले होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शहा यांनी कार्यकर्त्यांना रणनीतीबाबत मार्गदर्शन करताना सज्जड दम दिला. राज्य विधानसभा निवडणुकांची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असल्याने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, राष्ट्रीय पक्षांचे नेते राज्यातील नेत्यांसमवेत बैठका घेऊन रणनीती ठरवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी शहा यांनी पक्षाच्या पदाधिका-यांशी संवाद साधला. राज्यातील सत्तारूढ महायुती आणि भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षातील नेत्यांनी बंडखोरी केल्यास ते कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही असा सज्जड दम अमित शहा यांनी पदाधिका-यांना दिला. भाजपला विदर्भच ही निवडणूक जिंकून देणार आहे. मतदारसंघात गटबाजी सहन केली जाणार नाही, उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी हे प्रकार सहन केले जाणार नाहीत. आता सणासुदीचे दिवस येत आहेत.

त्यामुळे विजयादशमीपासून धनत्रयोदशीपर्यंत प्रत्येक बूथवर तरुण कार्यकर्त्यांनी फिरले पाहिजे, असे ते म्हणाले. निवडणुकांच्या निमित्ताने अमित शहा इंजेक्शन देत असले तरी आयाराम-गयारामांवर त्याचा काही परिणाम होईल असे वाटत नाही. महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निकालाचा परिणाम देशात होतो. पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत आपली सत्ता आणायची असेल तर महाराष्ट्रात विजय महत्त्वाचा आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या बूथवरील कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी आपल्यासोबत जोडा असे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले. येणारी विधानसभा निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील निकालाचे पडसाद इतर राज्यांमध्ये उमटणार आहेत. येणारी विधानसभा काबीज केल्यास पुढील लोकसभा निवडणुकीत आपले तीनशे पार खासदार असतील. म्हणून प्रत्येकाने मनापासून कामाला लागा अशा सूचनाही शहा यांनी केल्या. म्हणजेच भाजपच्या डोक्यातून तीनशे पार-चारशे पारचे फॅड अजूनही जात नाही! मित्रपक्षांच्या उमेदवारांचे कामही भाजपचा उमेदवार म्हणूनच करा असे सांगण्यासही शहा विसरले नाहीत.

महाराष्ट्रातील २०२४ ची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. एक कार्यकर्ता म्हणून संकल्प घेऊन पक्षाचे काम करा. लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्याचा ठपका पुसून टाका. धैर्याने निवडणुकीला सामोरे जा, असे आवाहनही शहा यांनी कार्यकर्त्यांना केले. विधानसभा निवडणुकीत अंतर्गत हेव्यादाव्यापासून दूर राहा. पाडापाडीचे राजकारण करू नका असा संदेशही अमित शहा यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात महायुतीला ४७ टक्के मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत हे प्रमाण ५१ टक्क्यांवर जाणे आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेचा सुमारे अडीच कोटी महिलांना लाभ होणार आहे. त्यामुळे साधारणत: ७० लाख मतांचा फरक भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील असेही शहा म्हणाले. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला विजयासाठी दहा टक्के मते अधिक हवी आहेत.

ती मिळवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा असा संदेश अमित शहा यांनी दिला आहे. त्यांनी फक्त ‘दहा टक्के मते’ असे म्हटले असले तरी लोकशाही राजकारणातील निवडणुकीचा विचार करता हे प्रमाण खूपच अधिक आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांना खूपच परिश्रम घ्यावे लागणार आहेत. कारण आतापर्यंतच्या निवडणुकांचा विचार करता दोन ते तीन टक्के मतांचा जरी बदल झाला तरी सत्तांतर होऊ शकते. राज्यात पुन्हा सत्तेवर येण्यासाठी जर १० टक्के अधिक मते मिळवायची असतील तर त्यासाठी भाजप, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट या सर्वांच्या एकत्रित मतांचीच बेरीज होण्याची गरज आहे. कारण भाजपच्या पारंपरिक मतदारांच्या संख्येवर मर्यादा आहेत. जे पारंपरिक मतदार आहेत आणि मतदानासाठी बाहेर पडत नाहीत त्यांनाच बाहेर काढण्याचे काम करावे लागणार आहे.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ पक्षातून फुटून बाहेर असल्यामुळे आपोआप त्यांच्या मतदारांमध्ये विभाजन झाले आहे. या दोन नेत्यांनासुद्धा आपल्याला मानणा-या आणि मत देणा-या मतदारांची संख्या वाढवावी लागणार आहे. मतदार कोणत्या गटाची बाजू घेतील हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे हे काम वाटते तितके सोपे नाही. सध्या सत्ता हातात असल्यामुळे मतदारांना आकर्षित करणारे विविध प्रकारचे निर्णय सरकार घेत आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून महिलांच्या मतांचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न दिसतोच आहे. काँगे्रसला पराभूत करणे हेच लक्ष्य ठेवताना दुसरीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखणे आवश्यक असल्याचा संदेश अमित शहा यांनी दिला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या विदर्भाला खिंडार पडल्याची खंत शहा यांना वाटत असावी.

अर्थात विदर्भ राखण्याचे काम भाजपलाच करावे लागणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यावर अमित शहा यांनी लक्ष केंद्रित केलेले दिसते. कारण लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपला एकही जागा जिंकता आली नाही. विदर्भात केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. महायुतीला राज्यात पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर विदर्भातील किमान ४५ आणि मराठवाड्यातील ३० जागा जिंकणे आवश्यक आहे. म्हणूनच शहांनी ‘मिशन ४५’चा नारा दिला असावा. लोकसभेला काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी या विजयात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा मोठा वाटा होता हे शहा जाणून आहेत म्हणूनच महाराष्ट्राची निवडणूक देशाच्या राजकारणावर परिणाम करणारी ठरते असे विधान अमित शहा यांनी केले आहे.

महायुतीसाठी जागा वाटप ही डोकेदुखी ठरणार आहे. कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे समाधान करणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. या नेत्यांसोबत शहा यांनी मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत खलबते केली. तिस-यांदा सत्तेत आल्याचे मोदी सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांत मोदींनी देशासाठी कोणत्या महत्त्वाच्या भूमिका घेतल्या? कोणते महत्त्वाचे धोरण आखले? तर महाराष्ट्रात तीन वा-या केल्या, आता चौथी वारीही पूर्ण होईल, तसेच काही परदेश दौरेही केले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने हिसका दाखवल्याने आता पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. ऊठसूठ त्यांच्या महाराष्ट्र वा-या सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR