नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यातील कांही भागात मंगळवारी सायंकाळी अचानक गारांसह वादळी वारा आणि अवकाळी पाऊस सुरू झाला. या वादळी वा-यामुळे शेतातील केळी, ज्वारी, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे बळीराजा हतबल होवून शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हिमायतनगर, भोकर आणि उमरी तालुक्यात काही ठिकाणी वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाला. अर्धापूर तालुक्यातील चेनापूर आणि चेनापूर तांडा परीसरात काही ठिकाणी प्रचंड गारपीटसह अवकाळी पाऊस झाला. या गारपीटीचा शेतक-यांच्या शेतातील उभ्या पिकांना मोठा फटका बसला.
वादळी वा-यामुळे केळीच्या पानाची चाळण झाली असून गारांचा फटका परिपक्व होत असलेल्या केळीच्या घडाला बसला. काही ठिकाणी हातातोंडाशी आलेल्या ज्वारीचे पिक जमिनीवर कोलमडून पडली आहेत. तसेच शेतातून काढलेली हळद देखील अवकाळी पावसामुळे भिजली असून शेतक-यांच्या हळदीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन शासनाने शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे.