अमृतसर : वृत्तसंस्था
गेल्या महिन्याभरापासून पंजाब आस्मानी संकटाचा सामना करत आहे. राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि रावी, सतलज, व्यास नद्यांचा रौद्रवतार यामुळे अर्धे पंजाब पाण्यात बुडाले आहे. १३०० गावांना पुराने वेढा दिला असून, पाऊस आणि पुरामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक घरंदार सोडून सुरक्षित स्थळी गेले आहेत.
पंजाबमध्ये महापुरामुळे हाहाकार उडाला असून, पिकं पूर्ण पाण्यात सडली आहेत. घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी मदत शिबिरांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे.
पाऊस आणि पुराचा अमृतसर जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. ३५ हजार लोक बेघर झाले आहेत. त्यापाठोपाठ फिरोजपूर जिल्ह्यातही २४ हजार १५ लोकांना घर सोडून मदत शिबिरात जावे लागले आहे. फाजिल्कामध्ये २१५६२, पठाणकोटमध्ये १५०५३, गुरुदासपूरमध्ये १४५००, होशियारपूरमध्ये ११५२, एसएएस नगरमध्ये ७०००, कपूरथलामध्ये ५६५०, मोगामध्ये ८००, जालंधरमध्ये ६५३, मानसामध्ये १६३ तर बरनालामध्ये ५९ लोकांना पुराचा फटका बसला आहे.
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे सर्वाधिक ६ बळी पठाणकोट जिल्ह्यात गेले आहेत. त्यापाठोपाठ अमृतसर, बरनाला, होशियारपूर, लुधियाना, मानसा आणि रुपनगर जिल्ह्यात प्रत्येकी ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. इतर जिल्ह्यातही मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पठाणकोटमध्ये ३ लोक बेपत्ता आहेत.