पालम : अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याप्रकरणी आई, वडील, पती, सासू आणि सास-यांसह तब्बल १० जणांविरोधात पालम पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल लैंगीक अपराधापासून संरक्षण यासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनच्या दिवशीच ही घटना उघडकीस आली आहे.
पूर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील एका अल्पवयीन मुलीचा विवाह पालम तालुक्यातील सायळा येथील देविदास पारडकर याच्याशी २१ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला होता. लग्नानंतर या मुलीच्या पोटात सतत दुखत असल्याने तिला येथील एका खाजगी रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. परंतू डॉक्टरांनी तिला नांदेड येथील शासकीय रूग्णालयात उपचार करण्याचा सल्ला दिला होता. या रूग्णालयात पिडीत मुलीच्या विविध चाचण्या आणि सोनोग्राफी करण्यात आल्यानंतर ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर पिडीत मुलीने पालम पोलिस ठाणे गाठून पवन दुधाटे, शुभम नवघरे, अनंत नवघरे, चिल्या नवघरे यासह अन्य एका विरूध्द लग्नाचे अमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याची फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी या आरोपीविरूध्द पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याशिवाय बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार आई रूक्मिनी आवड, वडील पुरभाजी आवाड, पती देविदास पारडकर, सासरे गंगाधर पारडकर यांच्या विरूध्द दि.७ मार्च रोजी गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लोखंडे, राजेश्वर येसूरकर करत आहे.