लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५ -औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी लातूर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रांवर शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी ३९ हजार ७०३ पदवीधर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानपूर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाने आवश्यक नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील ८८ मतदान केंद्रांसाठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी व कर्मचा-यांना २२ ऑक्टोबर रोजी संबंधित तहसील कार्यालयातून मतदान साहित्याचे वाटप करून त्यांना संबंधित मतदान केंद्रांवर रवाना करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी क्षेत्रीय अधिका-यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
४१ उमेदवार मराठवाडयाच्या मैदानात
औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मराठवाडयातील ४१ उमेदवार पदवीधर आमदार होण्याचे स्वप्न बाळगून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मतदार संघ मोठा असल्याने अनेकांनी सोशल मिडीयाद्वारेच बराचसा प्रचार उरकला आहे. कांही उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदार, संस्था, महाविद्यालयांना भेटी देत आपण आजूनही मजबूतपणे निवडणुकीत प्रबळ दावेदार असल्याचे सर्वांना भासवले आहे. जाणकार पदवीधर मतदार कोणाला पसंती क्रम देणार हे आज ठरणार आहे.
निवडणूक निरीक्षकांनी घेतला मतदान केंद्रांवरील तयारीचा आढावा
महाराष्ट्र विधानपरिषद द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत ५-औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक माधवी खोडे-चावरे यांनी अहमदपूर तालुक्यातील निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेतला. यानिमित्त त्यांनी दोन मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली. तेथील तयारीचा त्यांनी आढावा घेवून अनुषंगिक सूचना दिल्या. अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्ज्वला पांगारकर यावेळी उपस्थित होत्या.
मतदानाचा हक्क बजाविण्याचे आवाहन
शुक्रवार दि. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया निर्भय, निष्पक्ष व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदारांना २३ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावण्याचे आवाहन केले आहे.
















