रेणापूर : सिद्धार्थ चव्हाण
तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील कामे घटली असून, शेतमजुरांसह बांधकाम क्षेत्रातील रोजंदारी कामगारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाल्याने निंदणी, कापणी यांसारखी शेतीतील कामे कमी झाली आहेत. त्यातच पाणीटंचाईमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील बांधकामे मंदावल्याने मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले आहे.
तालुक्यातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर अवलंबून आहे. शेतीत काम मिळत नसल्याने शेतमजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, बांधकाम क्षेत्रातील गवंडी, सेंट्रिंग कामगार आणि इतर मजुरांनाही नियमित रोजगार मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविताना मजुरांची दमछाक होत आहे. रोजगाराच्या शोधात अन्य शहरांकडे स्थलांतर करण्याची वेळ मजुरांवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोजगार हमी योजनेच्या कामांमधून पुरेसा रोजगार उपलब्ध होणे आणि कामाचा मोबदला वेळेत मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे. दुष्काळी परिस्थितीत मजुरांना गावातच काम उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
















