निलंबनाची मागणी, औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून सत्ताधारी आक्रमक
दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
मुंबई : प्रतिनिधी
समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी औरंगजेबाची प्रशंसा करताना केलेल्या विधानाचे पडसाद मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटले. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करत सत्ताधारी आमदारांनीच सभागृहात गदारोळ केला. या गदारोळामुळे सभागृह ३ वेळा व नंतर दिवसभराकरिता तहकूब करावे लागले.
समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी विधान भवन परिसरात सोमवारी औरंगजेब हा चांगला शासक होता. त्याच्या कारकिर्दीत भारत प्रगतीशिखरावर होता, अशा आशयाचे विधान केले होते. या विधानाचे पडसाद मंगळवारी विधानसभेचे कामकाज सुरू होताच उमटले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रश्नोत्तराचा तास केवळ पुकारलाच होता. तोवर भाजप आमदार महेश लांडगे यांनी आझमींच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. अतुल भातखळकर यांनी अबू आझमींचे देशद्रोही कृत्य आहे. आझमींवर देशद्रोहाचा खटला दाखल करा, त्यांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करा, अशी मागणी केली. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, असे म्हटले. यावरून सुधीर मुनगंटीवारही आक्रमक झाले.
सत्ताधारी सदस्यांसोबतच विरोधी पक्षातील ठाकरे गटाचे आमदारही आक्रमक झाले आणि आबू आझमीविरोधात कारवाई करण्याची हिंमत दाखवा, असे म्हटले. आम्ही याच विषयावर स्थगन प्रस्ताव दिला आहे. केंद्रात आणि राज्यात सरकार तुमचे आहे. सरकार नेमके काय करते आहे? या प्रकरणी कारवाई करा. अबू आझमीवर कारवाई करा. तुम्हाला समाजा-समाजात वाद निर्माण करायचा आहे, असे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले. यावेळी सत्ताधारीही आक्रमक झाल्याने सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब करावे लागले.
आझमींवर देशद्रोहाचा
गुन्हा दाखल करा : शिंदे
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेक-याचे औरंग्याचे गोडवे अबू आझमीने गायले. त्याचा मी धिक्कार करतो. आझमी देशद्रोही आहे. या देशद्रोह्याला या सभागृहात बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे आझमीला निलंबित करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडली.