ओडिशातील पुरीपर्यंत पोहोचली हेरगिरीची लिंक?
चंदीगड : वृत्तसंस्था
हरियाणाच्या हिस्सार येथील प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक झाल्यानंतर गुप्तचर विभागाने आता सखोल तपास सुरु केला आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरीचे काम करण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर ओडिशाचे कनेक्शन समोर आले आहे. केंद्रीय गुप्तचर विभाग आणि पुरीचे पोलिस याचा संयुक्तपणे तपास करीत असून, पुरीपर्यंत याची लिंक पोहचली आहे. यामध्ये आणखी एक युट्यूबर रडारवर असल्याचे समजते.
ज्योती मल्होत्रा आपल्या व्लॉग्स आणि सोशल मीडिया कंटेन्टसाठी प्रसिद्ध आहे. तिच्यावर भारतीय सैन्य दलाची ठिकाणी आणि महत्वाच्या ठिकाणांची माहिती पुरविण्याचा आरोप आला आहे. सायबर-गुप्तहेरीचे नेटवर्क या मागे असल्याचे म्हटले जात आहे. यात सोशल मीडिया आणि डिजिटल इन्फ्लुएंसर्सचा वापर देशातील अंतर्गत माहिती लिक करण्यासाठी केला जात आहे. सप्टेंबर २०२४ पासून ज्योती मल्होत्राने पुरीचा दौरा केला होता. त्यावेळी तिने जगन्नाथ मंदिर आणि त्याच्या जवळील सरकारी परिसरातील मंदिराचे फोटो आणि व्हिडीओ चित्रीत केले होते. ही माहिती पाकिस्तानातील हस्तकांना पुरविली असावी, असा संशय आहे. या दरम्यान ओडिशाची युट्यूबर प्रियंका सेनापती हिच्या संपर्कात होती, तिचे आणि ज्योतीचे संबंध कसे होते याचा तपास सुरु आहे.
संशयावरून सखोल तपास
ज्योती मल्होत्रा आणि ओडिशाच्या पुरी येथील कंटेन्ट क्रिएटर प्रियंका सेनापती यांच्यात संबंध असल्याचा संशय असल्याने गुप्तचर विभागाने पुरी पोलिसांच्या मदतीने संयुक्तपणे तपास सुरु केला आहे. त्यावर प्रियंका सेनापतीने ज्योती मल्होत्रा केवळ एक मैत्रीण होती. तिच्या व्यवहाराबद्दल आपल्याला कल्पना नव्हती, असे सांगितले.