लातूर : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, कर्करोग प्रतिबंधाबाबत योग्य माहिती मिळावी आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व पटावे, या उद्देशाने स्वामी विवेकानंद विद्यालय, लातूर आणि ऑल इंडिया लायनेस क्लब, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपले आरोग्य, आपली जबाबदारी’ या विशेष आरोग्यजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी डॉ. प्रियांका राठोड, प्राचार्य मारुती सूर्यवंशी, प्राचार्य गोविंद शिंदे, मुख्याध्यापिका अरुणा कांदे, उपमुख्याध्यापिका अलका अंकुशे, संगीता जगताप, राधा कवरे, यांच्यासह महिला पालक, सर्व महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कर्करोग प्रतिबंध आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर डॉ. राठोड यांनी कर्करोग प्रतिबंधासाठी नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्यास सांगीतले. आरोग्यविषयक लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. निरोगी जीवनशैलीचा स्वीकार केल्यास आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडवून आणता येतात, असा संदेश त्यांनी दिला. स्वामी विवेकानंद विद्यालय, लातूर आणि ऑल इंडिया लायनेस क्लब, लातूर यांच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आरोग्य, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सकारात्मक जीवनशैली यांविषयी जनजागृती करण्यास हातभार लागला.
















