31.3 C
Latur
Saturday, April 11, 2026
Homeलातूरआर्थिकदृष्ट्या अमेरिकेला परवडत नाही म्हणून युध्द थांबले

आर्थिकदृष्ट्या अमेरिकेला परवडत नाही म्हणून युध्द थांबले

लातूर : प्रतिनिधी
जगाचं राजकारण हे इतिहास आणि वर्तमान रक्तरंजित करणा-या ‘तेला’ भोवती फिरत आहे. १९३० च्या सुमारास तेल बाजारपेठेकडे जगाचे लक्ष केंद्रीत झाले. गेल्या १५० ते २०० वर्षांपासून तेलाचा वाद आहे. सुमारे ३५० उत्पादने तेलाशी संबंधीत आहेत. त्यामुळेच अमेरिकेने इराणीशी युद्ध सुरु केले. परंतू, आर्थिकदृष्ट्या हे युद्ध अमेरिकेला परवडत नाही म्हणून ते थांबले, असे मत विख्यात लेखक आणि ‘दैनिक लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेच्या वतीने दि. ११ एप्रिल  रोजी सायंकाळी येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या ‘कस्तूर-कांचन सभागृहात, विख्यात लेखक आणि ‘दैनिक लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचा संवाद आयोजित करण्यात आला आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना गिरीश कुबेर म्हणाले, ऊर्जेची मालकी महत्वाची आहे. ऊर्जाविषयक धोरणे महत्वाची असतात. आपल्या देशात ऊर्जाविषय धोरणे उद्योगपतीला धार्जिने आहेत, देशाला नाही. ज्या ज्या देशांनी ऊर्जेविषयक  धोरणाला महत्व दिले ते ते देश मोठे झाले. अभियांत्रिकी क्षेत्रात चीन खुप पुढे आहे आणि आपल्याकडे उच्चशिक्षीत बेरोजगार आहे. आपल्याकडे आर्थिक विचारच सांगीतला जात नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी काय करायला हवे?, याचे आकलनच राज्यकर्त्यांना नाही.
यावेळी गिरीश कुबेर यांनी ‘दाखवल्या’ आणि ‘खेळवल्या’ जाणा-या युद्धामागील सूत्रधार कोण असतात? बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे न वापरता केवळ जीवजंतू पाठवून ‘युद्ध’तयारी कशी होते? युद्धातून नफेखोरी कशी होते? अचाट आघाडी घेणा-या चीनच्या विकासाचे स्वरूप नेमके कसे आहे? रशियाला महासत्ता बनवण्याचा ध्यास घेतलेले पुतीन कसे घडत गेले? आदी विषयांवरही अभ्यासपूर्ण भाष्य केले. प्रारंभी स्वामी रामानंदतीर्थ व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीनिवास लाहोटी, उपाध्यक्ष डॉ. अजित जगताप यांनी गिरीश कुबेर यांचा सत्कार केला. यावेळी कमलकिशोर अग्रवाल आणि डॉ. मिलिंद पोतदार, डॉ. सूर्यकांत निसाले, डॉ. अशोक गानु, सुपर्ण जगताप, डॉ. बी. आर. पाटील यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते. गिरीश कुबेर यांच्याशी अतुल देऊळगावकर यांनी संवाद साधला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR