मुंबई : मराठी प्रेक्षकांसाठी आजचा दिवस खरोखरच खास ठरणार आहे. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित भव्य चित्रपट ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक टीझर रविवारी पहिल्यांदाच राष्ट्रीय टेलिव्हिजनवर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे हा ऐतिहासिक क्षण प्रेक्षकांना लोकप्रिय रिएलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ मधून अनुभवता आला आहे. या शोचे होस्ट रितेश विलासराव देशमुख यांनी स्वत: आपल्या ‘भाऊचा धक्का’ या खास सेगमेंटमध्ये हा टीझर सादर केला. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
आज, ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर हा ऐतिहासिक क्षण पाहता येणार आहे. ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट केवळ एक सिनेमॅटिक प्रोजेक्ट नसून मराठी माणसाच्या अभिमानाचा आणि इतिहासाचा गौरव करणारा एक भव्य सोहळा ठरणार आहे. आपला राजा, आपला अभिमान या घोषवाक्याखाली साकारलेला हा चित्रपट प्रेक्षकांना शिवरायांच्या पराक्रमाची नव्या पद्धतीने अनुभूती देणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर टीव्हीवर प्रदर्शित करण्यामागे निर्मात्यांचा उद्देश स्पष्ट आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत शिवरायांचा गौरव पोहोचवणे.
‘बिग बॉस मराठी’सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मवरून हा टीझर लाँच केल्यामुळे तो घराघरात पोहोचणार आहे. इतिहास, भावना आणि भव्यता यांचा संगम असलेला ‘राजा शिवाजी’ चित्रपट १ मे २०२६ पासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठीसोबतच हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही रिलीज होणार आहे, ज्यामुळे शिवरायांची गाथा देशभरात आणि जागतिक स्तरावर पोहोचणार आहे.
एकंदरीत, ‘राजा शिवाजी’चा हा फर्स्ट लूक टीझर केवळ एक झलक नसून मराठी अस्मितेचा अभिमान जागवणारा क्षण आहे. आज रात्री ८ वाजता हा भव्य सोहळा पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. कारण हा फक्त टीझर नाही, तर इतिहासाला दिलेला एक मानाचा मुजरा आहे.

