28.5 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeमहाराष्ट्रआषाढी एकादशी दिवशीच ‘एसटी’ चा संप?

आषाढी एकादशी दिवशीच ‘एसटी’ चा संप?

आर्थिक न्याय्य मागण्यांसाठी महामंडळातील सर्व संघटनांचा एल्गार

मुंबई : प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या दिवशीच एसटी कामगारांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारचे टेन्शन वाढण्याची चिन्हं आहेत. आपल्या आर्थिक न्याय्य मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांनी एल्गार पुकारला आहे. पुढच्या महिन्यात ९ जुलै आणि १० जुलै रोजी विधिमंडळाच्या अधिवेशनावर आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलनाचा इशारा एसटी कामगारांनी दिला आहे.

दरम्यान, २६ जून २०२४ रोजी एसटी कर्मचा-यांचे नेतृत्व करणा-या बहुतांश संघटनांनी एकत्रित लढण्याचा निर्धार केला असून राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रशासनाला आंदोलनाची नोटीस बजावणार आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास ९ ऑगस्ट २०२४ क्रांतिदिनापासून राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती दिली आहे.

तसेच, ४ जुलै रोजी एसटी को-ऑप. बँकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात सहकार आयुक्त पुणे आणि जिल्हाधिकारी पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढणार असल्याची माहितीही सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य या एसटी कामगारांच्या संघटनेने दिली आहे.

एसटी संघटनांच्या मागण्या
राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे एसटी कर्मचा-यांना
वेतन मिळायलाच पाहिजे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक,
वेतनवाढीच्या दराचा फरक, ४८४९ रुपये कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप, नुकत्याच मूळ वेतनात जाहीर केलेल्या ५ हजार, ४ हजार, २५०० रुपयांऐवजी सरसकट ५ हजार मिळावेत, सर्व रा. प. कर्मचा-यांना इनडोअर आणि आऊटडोअर मेडिकल कॅशलेस योजना लागू करा, खाजगीकरण बंद करा, सुधारित जाचक शिस्त आणि आवेदन कार्यपद्धती रद्द करा, जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा, चालक/ वाहक/कार्यशाळा व महिला कर्मचा-यांना अद्ययावत आणि सर्व सुखसोयींचे विश्रांतीगृह द्या, वेळापत्रकातील त्रुटी दूर करा, सेवानिवृत्त झालेल्या आणि होणा-या कर्मचा-यांना निवृत्तिवेतन (पेन्शन) मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांत संयुक्त घोषणापत्रानुसार दुरुस्ती करण्यात यावी, विद्यमान आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटुंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या.

सर्व मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर झाल्याच पाहिजेत, यासाठी एल्गार पुकारण्याचा ठरावही एसटी कामगारांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. तसेच, बैठकीत ‘हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है… हम सब एक है’ असा नाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR