लातूर : एजाज शेख
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. २३ सप्टेंबर रोजी लातूर जिल्ह्यात येऊन कोरड्या दुष्काळाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासमोर शेतक-यांनी टाहो फोडून दुष्काळाच्या व्यथा, वेदना मांडल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री भाऊक झाले होते. त्यांनाही आश्रू अनावर झाले होते. त्यामुळे त्यांनी २ दिवसांत आकलन करुन मंत्री मंडळ बैठकीत तातडीने थेट मदतीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनाला अता ८ दिवस होऊन गेले. बुधवारीच मंत्री मंडळाची बैठक झाली. परंतू, थेट मदतीचा विषयच पुढे आला नाही. त्यामुळे आस्मानी संकटाने खरीप तर सूलतानी संकटाने रबीही जाणार की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक-पाणी पाहणी करुन शेतक-यांशी संवाद साधल्यानंतर यंत्रणा कामाला लागल्याचे दिसत असले तरी त्यातून केंद्रस्थानी असलेला शेतकरीच सूटत असल्याने चिंता अधिक वाढत आहे. मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस लातूर जिल्ह्यात झाला आहे. आतापर्यंत ३५१ मिली मीटर म्हणजेच सरासरीच्या तुलनेत ४९.८२ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे सोयाबीनसह सर्वच पिके करपून गेली आहेत. पहिल्या ट्रिगरमध्ये समावेश होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा अहवाल वरिष्ठ पातळीवरुन जिल्हा प्रशासनाकडे मागवण्यात आला होता. त्यानूसार दि. २४ सप्टेंबर रोजी अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असून खरीप हंगामातील पिकांचे नुकसान हे ७० ते १०० टक्के झाले आहे.
केवळ अहवालच नाही तर बांधावरची स्थिती काय आहे?, याची पाहणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यांनी शेतक-यांशीही संवाद साधला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाच्या हालचाली सुरु आहेत. कृषी विभाग आणि विमा कंपनीने पीक परिस्थिती आणि कापणी प्रयोग सुरु झाले आहेत. यातून धक्कादायक ‘वास्तव’ समोर येत आहे.
















