शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख
शिरूर अनंतपाळ तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेती व फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश तहसीलदार किशोर यादव यांनी दिले. बुधवार, ३० सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयातील सभागृहात विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचा-यांची आढावा बैठक घेण्यात आली.
शासन निर्णय तसेच कृषी आयुक्त कार्यालयाच्या पत्रानुसार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेती व फळपिकांचे पंचनामे पुढील दोन दिवसांत पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. यासाठी महसूल, कृषी, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी तहसीलदार किशोर यादव, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सागर वरंडेकर, नगरपंचायतचे मुख्याधिकारी संदेश सालके, तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे, पशुसंवर्धनचे डॉ. गोल्हेर, जलसंपदाचे अतिश स्वामी, नायब तहसीलदार लालासाहेब कांबळे, गोरखनाथ पदकोंडे यांच्यासह सर्व मंडळ अधिकारी, सहायक कृषी अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते. पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे पंचनामे वेळेत पूर्ण होऊन शासनाकडून प्रत्यक्ष मदत मिळण्याची शेतक-यांना अपेक्षा आहे. दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याच्या प्रशासनाच्या सूचनेमुळे मदतीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
















