माणूस जन्म-मृत्यूच्या फे-यातून सुटका व्हावी म्हणून भक्तिमार्गाला लागतो. काहीजण पापातून मुक्त व्हावे म्हणून ईश्वरभक्ती करतात. मुळात पाप करायचेच कशाला हा प्रश्न आहे. परंतु माणसाची चंचल वृत्ती त्याला गप्प बसू देत नाही, मग मोहात पडणे वगैरे गोष्टी होतात. राजकीय व्यक्तींना भ्रष्टाचार नेहमीच खुणावत असतो. एकदा का तो भ्रष्टाचाराच्या मोहात पडला की त्यातून त्याची सुटका होणे कठीणच असते. मग त्यातून सुटका करून घेण्यासाठी तो धडपडत राहतो. राज्याचे नागरी आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची सध्या अशीच अवस्था झाली आहे.
तपास यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली. ईडीच्या कारवाईतून मुक्त होण्यासाठी आपण भाजपबरोबर गेलो असे त्यांनी म्हटले आहे. मी ओबीसी असल्याने माझ्यावर कारवाई करण्यात आली, मी उच्चवर्णीय असतो तर ही कारवाई झाली नसती असेही ते म्हणाले. भुजबळ यांचे हे वक्तव्य हास्यास्पद आणि बालिश म्हणावे लागेल. कारण तुम्ही गुन्हाच केला नसता अथवा घोटाळा केला नसता तर ईडी तुमच्या मागे लागलीच नसती. ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हटले जाते. तुम्ही काही केले नसेल तर भीती कशाची? मूळ पक्ष सोडून आपण भाजपच्या आश्रयाला गेलो तर आपले सारे गुन्हे माफ होतील हे तुम्हाला माहीत होते. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता.
कारण त्यामुळे ईडीपासून सुटका झाली. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एकप्रकारे पुनर्जन्मच होता अशी कबुली भुजबळ यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात सोडला आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदींसह भाजपच्या आश्रयाला गेले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसंदर्भात जे केले तेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीशी केले. एकनाथ शिंदे यांच्या अनेक साथीदारांप्रमाणे अजित पवार यांच्या साथीदारांवर विविध आरोप होते. काही जणांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया सुरू होत्या. अजित पवार हेही ईडीच्या रडारवर होते. भुजबळ दोन-अडीच वर्षे तुरुंगात होते. जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांना ईडीची पुन्हा नोटीस आली होती. भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही हे लक्षात आल्यामुळे भाजपबरोबर जाण्याचा निर्णय भुजबळांनी घेतला.
भाजपबरोबर जाण्याने ईडीच्या जाचापासून सा-यांची सुटका झाली अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. भुजबळ यांनी हा सारा तपशील राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राईज्ड इंडिया’ या पुस्तकात नोंदवला आहे. ‘हमारे साथ ईडी है’ या प्रकरणात त्यांनी राज्यातील राजकारण आणि पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील सत्य कथन केले आहे. भुजबळांचे वक्तव्य प्रसिद्ध झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटले. भुजबळांनी तातडीने पत्रकार परिषद घेत ईडी चौकशीमुळे नव्हे तर विकासासाठी सत्तेत सहभागी झालो अशी सारवासारव करत घूमजाव केले. आपण कसलीही मुलाखत दिलेली नाही. राजदीप सरदेसाई यांचे पुस्तक वाचलेले नाही, त्यामुळे पुस्तकात काय प्रसिद्ध झालेले आहे ते आपल्याला माहीत नाही. निवडणुकीच्या धामधुमीत लक्ष विचलित करण्याची ही कृती असेल असे भुजबळांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ यांनी अशा आशयाची कोणतीही मुलाखत दिलेली नाही. निवडणुकीच्या काळात महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवून चुकीचे कथानक रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी भुजबळांची पाठराखण करताना अजित पवार यांनी तरफदारी केली आहे. छगन भुजबळ यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे तेच पुस्तकात आहे. राजकारणात मला काही रस नाही. पत्रकार, लेखक या नात्याने जी वस्तुस्थिती आहे ती मी पुस्तकात मांडली आहे. अशी प्रतिक्रिया राजदीप सरदेसाई यांनी दिली आहे. ईडीच्या चौकशीचा ससेमिरा आणि पुन्हा अटक टाळण्यासाठी भाजपच्या आश्रयाला गेलो अशी स्पष्ट कबुली भुजबळ यांनी दिली आहे. प्रफुल्ल पटेल यांची काही मालमत्ता जप्त करण्यात आली होती. अजित पवार यांच्यावरही ईडीची टांगती तलवार होती. या चौकशीत सुनेत्रा पवार यांनाही अटक होण्याची शक्यता होती.
म्हणून भाजपसोबत जावे आणि या चौकशा थांबवाव्यात अशी गळ शरद पवार यांना घालण्यात आली होती. परंतु शरद पवार यांनी नकार दिल्याने अजित पवार यांनी बंड केले. अजित पवार गटाला भाजपने शुद्ध करून घेतले आहे हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट झाले आहे. कुठल्याही पक्षात राजकीय नेते धुतल्या तांदळासारखे नसतात हे सिद्ध झाले आहे. केंद्र सरकार सांगेल तेव्हा ईडी एखाद्या संस्थेची वा व्यक्तीची चौकशी करते अथवा चौकशी गुंडाळून ठेवते हे या निमित्ताने उघड झाले आहे. सत्तेत असलेल्या भुजबळ यांनी दबावामुळे बंड केल्याची जाहीर कबुली दिली आहे. त्यांच्या खुलाशामुळे भाजपचा आणि केंद्र सरकारचा बुरखा फाटला आहे. भुजबळ यांनी कोणताही गुन्हाच केला नसता तर त्यांना पक्ष सोडायची गरजच भासली नसती. परंतु त्यांच्या कबुलीमुळे केंद्र सरकारचेही पितळ उघडे पडले आहे. केंद्राच्या सांगण्यावरून ईडीने काही ठराविक आमदार, खासदार व मंत्र्यांवर खोटे गुन्हे दाखल केले हे उघड झाले. भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर उघड झाला आहे.
ईडी, सीबीआय, प्राप्तिकर विभाग या यंत्रणांचा वापर करून विरोधकांना जेरीस आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे आमदार विकास आणि राज्याच्या हितासाठी भाजपबरोबर गेले नसून कारवाई टाळण्यासाठी सत्तेत जाऊन बसले आहेत हे उघड आहे. ईडीपासून मुक्ती मिळावी यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला यात शंका नाही. भुजबळ यांनी साळसूदपणाचा कितीही आव आणला तरी अखेर सत्य लपून राहत नाही, उलट ते त्यांच्याच मुखातून बाहेर पडले. डोळे मिटून दूध पिल्याने जगाला ते दिसणार नाही असे वाटत असले तरी जगाला ते ढळढळीतपणे दिसत असते!