सोलापूर –
ढोल-ताशांच्या गजरात मिठाई वाटत सोलापुरातील उत्तर भारतीय आणि व्यापारी वगनि तीन राज्यांत भाजपने मिळवलेल्या विजयाचा जल्लोष केला.
भारतीय जनता पक्ष व्यापारी प्रकोष्ठ आणि उत्तर भारतीय प्रकोष्ठच्यावतीने बाळीवेस येथील विजय चौकात जमून गळ्यात उपरणे परिधान करून भाजपचा झेंडा फडकवत जल्लोष करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांना, दुकानदारांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, नरेंद्र मोदी आगे बढो हम तुम्हारे साथ है, आपकी बार हॅट्रिक सरकार अशा घोषणा देण्यात येत होत्या.
भाजपचे शहर उपाध्यक्ष श्रीनिवास दायमा म्हणाले, देशातील अनेक राज्यांप्रमाणे राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमधील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या धोरणावर मतांच्या माध्यमातून शिक्कामोर्तब केले आहे. २०१४, २०१९ प्रमाणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही देशातील जनता पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून भाजपच्याच पाठीशी उभी राहणार आहे. याचा प्रत्यय या विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आला आहे.
याप्रसंगी भाजपचे कोषाध्यक्ष चंद्रकांत तापडिया, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष अनुपम खंडेलवाल, उत्तर भारतीय आघाडीचे प्रमुख आनंद शर्मा, रजनी शर्मा, मंगल दायमा, अनसूया जाजू, कमलाबाई शर्मा, जवाहर जाजू, पतंजली कुदाल, आशिष उपाध्ये, अनिल जोशी, मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष राकेश सोनी, सचिव कृष्णा झंवर, श्याम शर्मा, वालाप्रसाद ओझा, कृष्णकांत दायमा आदी उपस्थित होते.