कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय हा माहिती-तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगातील अद्भूत आविष्कार बनून समोर आला आहे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रवेश करत आहे. मोबाईल, उद्योगजगत, औषधोपचार, मोटारी, घरगुती उपकरणे इतकेच नव्हे तर कविता, संगीत आणि लेखनापर्यंत एआयने पाय पसरले आहेत. शिक्षणाचे क्षेत्रही एआय व्यापून टाकत आहे. केरळसारख्या राज्याने एआय टीचर आणून उद्याच्या भविष्याची झलक दाखवली आहे. येणा-या काळात शाळांमध्ये शिक्षकांची जागा रोबोट घेतील का? असा प्रश्न आज चर्चिला जात आहे; पण यापेक्षाही एआयचा वापर करून शिक्षणाची प्रक्रिया अधिक स्मार्ट आणि व्यापक, प्रभावी कशी करता येईल हा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा आहे.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो तर तो समाजाचा मार्गदर्शक आणि आदर्श असतो. तो स्वत:च्या वर्तनातून विद्यार्थ्यांना जीवनाची शिकवण देतो, असे डॉ. राधाकृष्णन यांचे मत होते. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात, त्यांची जिज्ञासा जागृत ठेवतात, त्यांना प्रश्न विचारायला प्रवृत्त करतात आणि ज्ञानाला जीवनमूल्यांशी जोडतात. मानवी भावनांची ओळख, सहानुभूती, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक समस्या समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता ही फक्त शिक्षकांकडेच असते. कोणताही अल्गोरिदम विद्यार्थ्यांच्या डोळ्यात उमटलेली कुतुहलाची चमक ओळखू शकतो का? की एखाद्या मुलाच्या शांत वर्तनामागील कौटुंबिक संघर्ष समजू शकतो? या मानवी नात्याची उकल आणि नक्कल कोणतेही मशिन करू शकत नाही; पण ए. आय. शिक्षणाला सहायक ठरत आहे. गृहपाठ तपासणे, परीक्षेचे मूल्यमापन करणे, विद्यार्थ्यांच्या शिकण्याची गती मोजणे, त्यांच्या कमकुवत भागांवर लक्ष केंद्रित करणे हे सर्व ए. आय. साधने झटपट करू शकतात त्यामुळे शिक्षकांचा वेळ वाचतो आणि त्यांना विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी अधिक अवधी मिळतो. विशेषत: भारतासारख्या देशात जिथे एका वर्गामध्ये ५०-६० विद्यार्थी असतात तिथे ए. आय. आधारित शिक्षण साधने खूप मोठी मदत ठरतात.
दक्षिण कोरियामध्ये ए. आय. आधारित ट्युटर्स आधीपासूनच शिक्षकांना पूरक ठरत आहेत. तिथे गृहपाठ तपासणी आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी ए. आय. साधने वापरली जातात. शिक्षकांचा वेळ वाचून त्यांना सर्जनशील अध्यापन करता येते. फिनलंडने शिक्षण व्यवस्थेत ए. आय.चा वापर करून प्रत्येक विद्यार्थ्याच्या ताकदी आणि कमकुवतपणानुसार अभ्यासक्रम तयार करण्याची पद्धत अवलंबली आहे. सिंगापूरनेही ए. आय.चा वापर मोठ्या प्रमाणावर केला आहे. तिथे विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करून त्यांची शिकण्याची प्रवृत्ती ओळखली जाते आणि शिक्षकांना त्यानुसार शिकवण्याचे मार्गदर्शन दिले जाते. या तिन्ही देशांनी स्पष्ट दाखवून दिले आहे की ए. आय. शिक्षकांना बदलण्यासाठी नव्हे तर त्यांना अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी वापरले जाऊ शकते; परंतु या प्रक्रियेत काही गंभीर अडचणी आहेत. भारतात डिजिटलायजेशन मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी नीती आयोगाच्या अहवालानुसार आजही ५० टक्क्यांहून कमी घरांमध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी योग्य इंटरनेट सुविधा आहे त्यामुळे मोठा वर्ग मागे पडतो. दुसरी गोष्ट म्हणजे ए. आय. हे टूल अद्ययावत आणि आश्चर्यकारक असले तरी ते विश्वासार्ह किंवा अचूक नाही अनेकदा ते चुकीची माहिती देते. त्यात पूर्वग्रहांचे प्रतिबिंब दिसते त्यामुळे एआय शिक्षकांना पर्याय ठरू शकत नाही.
आज गृहपाठ, असाईनमेंट, नोटस् या सर्वांसाठी वेळ कमी लागत असल्याने विद्यार्थ्यांचे अवलंबित्व वाढत चालले असले तरी भविष्यात यामुळे त्यांची स्वतंत्र विचारशक्ती व समस्या सोडवणुकीची क्षमता कमी होऊ शकते. पारंपरिक शिक्षणामध्ये हा धोका उद्भवत नाही तरीही नव्या तंत्रज्ञानाची कास धरायचीच असेल तर ती नावीन्यपूर्ण असायला हवी. उदाहरणार्थ, आज आपण जी गृहपाठाची पद्धत ठेवतो ती ए. आय. काही सेकंदांत सोडवतो. मग विद्यार्थ्यांना पाठांतरात गुंतवण्याऐवजी सर्जनशीलता, चिंतनशील विचार, सहकार्य, जीवनकौशल्ये आणि तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ए. आय.ला पर्याय म्हणून नव्हे तर सहायक म्हणून स्वीकारले पाहिजे.
ए. आय. हा टेलिस्कोप आहे; पण त्या टेलिस्कोपातून आकाश निरखणारा आणि विद्यार्थ्यांना ते कसे निरखायचे इथपासून त्या आकाशात दिसणा-या प्रत्येक सूक्ष्मातीसूक्ष्म गोष्टींची माहिती देणारा खगोलशास्त्रज्ञ म्हणजे शिक्षकच आहे. ए. आय. म्हणजे स्कॅल्पेल आहे; पण त्याचा योग्य वापर करून शस्त्रक्रिया करणारा वैद्यकीय तज्ज्ञ म्हणजे शिक्षकच आहे त्यामुळे साधन कितीही प्रगत असले तरी मानवी संवेदनशीलता, ममत्व, विवेक, शहाणपणा आणि नैतिक जाण असणा-या शिक्षकाला ते पर्याय ठरू शकत नाही. यामुळे प्रश्न हा नाही की ए. आय. शिक्षकांना बदलेल का? खरा प्रश्न असा आहे की ए. आय. आणि शिक्षक यांची सांगड घालून आपण शिक्षण अधिक परिणामकारक, अधिक सर्वसमावेशक आणि अधिक भविष्याभिमुख कसे घडवणार आहोत? या दृष्टीने विचारमंथन व्हायला हवे. उदाहरणार्थ, सिंगापूरने स्मार्ट नेशन धोरणांतर्गत २०३० पर्यंत जगातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे नेतृत्व मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. संशोधक, सरकार आणि उद्योग यांना एकत्र आणून ते शिक्षण अधिक वैयक्तिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सक्षम साथीदार, स्वयंचलित मूल्यमापन आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची पद्धत ओळखणारी यंत्रणा तयार होत आहे. फिनलँडचे एआय इन लर्निंग प्रकल्प जागतिक पातळीवर समता व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी संशोधन करीत आहेत. विद्यार्थी कल्याणाचे आकलन करणारी आणि त्यावर आधारित शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती देणारी प्रणाली ते तयार करीत आहेत. एकुणात चौथ्या आणि पाचव्या औद्योगिक क्रांतीत टिकायचे असेल तर कृत्रिम बुद्धिमत्ता व त्याच्याशी अनुकूल शिक्षणाचा स्वीकार अपरिहार्य ठरणार आहे.
– शहाजी शिंदे, संगणकप्रणाली तज्ज्ञ

