26.4 C
Latur
Friday, October 31, 2025
Homeलातूरएस. टी. चालकाच्या मुलाची भारतीय संघात निवड

एस. टी. चालकाच्या मुलाची भारतीय संघात निवड

चाकूर : प्रतिनिधी
कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर एस टी चालकाचा मुलगा अभिषेक देशपांडे याची भारतीय कर्णबधीर क्रिकेट संघात निवड झाली असून तो भारत आणि नेपाळ यांच्यात २७ ऑक्टोबर रोजी चंदीगड येथे होणा-या आंतरराष्ट्रीय टी-२० मालिकेत भारताकडून खेळणार आहे.
चाकूर तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील सांडोळच्या अभिषेक देशपांडेची भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मालिकेसाठी ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ अंतर्गत भारतीय कर्णबधिर संघात निवड झाल्याचे पत्र २५ सप्टेंबर रोजी प्राप्त झाले आहे. या कामगिरीमुळे तो राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखविण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेसाठी अभिषेक मध्यप्रदेशातील इंदोरहून दिल्लीसाठी रवाना झाला आहे. पंजाब राज्यातील चंदीगड येथे पंजाब डेफ अँड डंब स्पोर्ट्स असोसिएशन, पटियाला यांच्या माध्यमातून या स्पर्धा होत आहेत. भारत आणि नेपाळ या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका सोमवार २७ ऑक्टोबर २०२५, मंगळवार २८ ऑक्टोबर २०२५ आणि बुधवार २९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान तीन सामने खेळवले जाणार आहे.
१६ खेळाडूंमध्ये ६ व्या क्रमांकावर २२ वर्षीय अभिषेक देशपांडेची फलंदाज म्हणून निवड झाली आहे. अभिषेक श्रीरंग देशपांडे हा एस टी चालकाचा मुलगा आहे. तो जन्मजात कर्णबधिर आहे. त्याचे शिक्षण लातूर येथील विजयगोपाल मूकबधिर विद्यालयात १० वी पर्यंतचे पूर्ण झाले असून ११ वी १२ वाणिज्य शिक्षण मध्यप्रदेशातील इंदोर येथील मूकबधिर संघटन स्कीम येथे सुरु असतानाच त्याची भारत-नेपाळ आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मालिकेसाठी भारतीय कर्णबधिर संघात निवड झाली. गेल्या तीन वर्षांपासून अभिषेक कर्णबधिर क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहे. स्थानिक क्रिकेट संघटनेतून खेळताना अभिषेकने अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अनेक वेळा आपली छाप सोडली आहे.
भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आणि व्यवस्थापक यांनीही अभिषेकच्या निवडीचे स्वागत केले असून, त्याच्याकडून उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतीय कर्णबधिर क्रिकेट असोसिएशनने या मालिकेची तयारी सुरू केली असून, ही स्पर्धा दोन्ही देशांतील विशेष खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन देणारी ठरणार आहे. अभिषेकच्या या निवडीमुळे त्याच्या कुटुंबीयांमध्ये, मित्रपरिवारात तसेच स्थानिक क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR