21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयऑक्टोबरमध्ये १.७२ लाख कोटींचे जीएसटी संकलन

ऑक्टोबरमध्ये १.७२ लाख कोटींचे जीएसटी संकलन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सणासुदीच्या काळात ऑक्टोबर महिन्यात जीएसटी संकलनात मोठी भर पडली आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये एकूण जीएसटी संकलन १.७२ लाख कोटींवर झाले आहे. १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागू झाल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मधील जीएसटी संकलन हे दुसरे सर्वोच्च कर संकलन आहे. दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबर २०२२ च्या तुलनेत जीएसटी संकलनात १३ टक्के वाढ झाली आहे.

ऑक्टोबर २०२३ साठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने जीएसटी संकलन डेटा जारी केला. त्यानुसार ऑक्टोबरमध्ये १,७२,००३ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. यामध्ये ३०,०६२ कोटी रुपये सीजीएसटी, ३८,१७१ कोटी रुपये एसजीएसटी, ९१,३१५ कोटी रुपये आयजीएसटी आणि १२,४५६ कोटी रुपये सेसद्वारे जमा झाले आहेत.

देशातून सर्वाधिक जीएसटी संकलन महाराष्ट्रातून झाले आहे. महाराष्ट्रातून ५८,०५७ कोटींचा जीएसटी जमा झाला. मागील वर्षाच्या तुलनेत १९ टक्क्यांची वाढ दिसून आली तर दुस-या स्थानावर गुजरात राज्य आहे. दुस-या स्थानावर असलेल्या गुजरातमध्ये २४,००५ कोटींचा जीएसटी जमा झाला तर तामिळनाडूत २३ हजार ६६१ कोटींचा जीएसटी वसूल झाला. कर्नाटक राज्यातून ऑक्टोबर महिन्यात २३,४०० कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला.

२०२३-२४ या आर्थिक वर्षात सरासरी जीएसटी संकलन १.६६ लाख कोटी रुपये आहे, जे ११ टक्के अधिक आहे. त्याचवेळी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत या ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन १३ टक्के अधिक आहे. देशांतर्गत व्यवहारातून मिळणा-या महसुलात १३ टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये जीएसटी संकलन १,६२,७१२ कोटी रुपये होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये जीएसटी संकलन १५१,७१८ कोटी रुपये होते.

सरकारने सीजीएसटीमध्ये ४२,८७३ कोटी रुपये तर आयजीएसटीमध्ये ३६,६१४ कोटी रुपये एसजीएसटी म्हणून दिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात केंद्र सरकारला सीजीएसटीमधून ७२,९३४ कोटी रुपये तर राज्यांना ७४,७८५ कोटी रुपये एसजीएसटीमधून मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR