लंडन : वृत्तसंस्था
लंडन येथील लॉर्डसच्या मैदानात रंगलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने घरच्या मैदानात खेळणा-या इंग्लंडच्या संघाला पराभूत करीत विक्रमी सातव्यांदा टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरले. इंग्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकांत ४ विकेटस्च्या बदल्यात १५० धावा केल्या होत्या. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या आतापर्यंतच्या इतिहासात एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कोणत्याही संघाने केला नव्हता. पण ऑस्ट्रेलियाने विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करीत आपला दरारा कायम ठेवला. विशेष म्हणजे इंग्लंडच्या मैदानात त्यांनी प्रथमच जेतेपद पटकावले.
यंदाच्या महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघ आपापल्या गटातून एकही सामना न गमावता फायनलमध्ये पोहोचले होते. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत एकही सामना न गमावता विक्रमी विजयासह सातव्यांदा जेतेपद पटकावले. नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. त्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने निर्धारित २० षटकांत ४ विकेट गमावून १५० धावांपर्यंत मजल मारली होती. या धावसंख्येचा पाठलाग करताना जॉर्जिया वोलच्या रुपाने लवकरच पहिला धक्का बसला. त्यानंतर बेथ मुनी आणि फिबी लिचफिल्ड जोडीने डाव सावरला. त्यामुळे १८ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ७ विकेटस राखून ऑस्ट्रेलियाने आपला विजय निश्चित केला आणि टी-२० वर्ल्डकपमध्ये सातव्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्याचा विक्रम नोंदवला.
















