नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध १३ सप्टेंबरपासून सुरू होणा-या तीन सामन्यांच्या टी २० आंतरराष्ट्रीय मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात युवा वेगवान अष्टपैलू खेळाडूचा समावेश झाला आहे. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने नितीश कुमार रेड्डी याला पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे घोषित केले. बंगळुरू येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे अंतिम मॅच सिम्युलेशन चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर २३ वर्षीय रेड्डीला वैद्यकीय मान्यता मिळाली आहे.
नितीश कुमार रेड्डी गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंज देत होता. जून महिन्यात अफगाणिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिके दरम्यान त्याच्या डाव्या मांडीच्या दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली होती. या दुखापतीमुळे त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमधून बाहेर राहावे लागले होते. त्यामुळे अफगाणिस्तान टी २० मालिकेसाठी त्याची निवड फिटनेस टेस्ट पास करण्याच्या अटीवर करण्यात आली होती. बंगळुरूमधील अंतिम चाचणीदरम्यान त्याच्या गोलंदाजीच्या वर्कलोडचे बारकाईने निरीक्षण करण्यात आले. तेथे त्याने कोणताही त्रास न होता गोलंदाजी करत स्वत:ला मॅच-फिट सिद्ध केले. त्यानुसार, तो गुरुवारी नवी दिल्ली येथे भारतीय संघात दाखल होत आहे.
हार्दिक पांड्या संघात नाही
स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे संघात नाही. या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, नितीश रेड्डीचे पुनरागमन कर्णधार श्रेयस अय्यर आणि संघ व्यवस्थापनासाठी सकारात्मक बातमी आहे. हार्दिक पांड्या आणि नितीश रेड्डी दोघेही वेगवान गोलंदाजी करणारे अष्टपैलू आहेत. त्यामुळे संघाला त्याचा फायदा होऊ शकतो. नितीश रेड्डीने भारतासाठी आतापर्यंत खेळलेल्या ४ टी२० सामन्यांमध्ये १८०च्या स्ट्राईक रेटने ९० धावा केल्या आहेत आणि ३ बळीही घेतले आहेत.
















