24 C
Latur
Tuesday, February 24, 2026
Homeलातूरकर्जमुक्ती, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दिलेला शब्द सरकारने पाळावा

कर्जमुक्ती, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी दिलेला शब्द सरकारने पाळावा

लातूर : प्रतिनिधी
कधी पाऊस नाही, तर कधी अतिवृष्टीचा फटका. यातून सावरत असतानाच सरकारचा कृषी, उद्योग, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेली तरतूद आणि त्या तरतूदीची अंमलबजावणी या सर्वच पातळ्यांवर राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पाकडून सामान्य नागरीकांपासून ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा अर्थसंकल्पातून पूर्ण व्हाव्यात, अशी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
उत्पादन खर्चावर आधारीत रास्त भाव द्यावा
कर्जमुक्तीचा दिलेला शब्द सरकारने पाळवा आणि त्याला कसलीही अट न लावता चालू बाकीदार व थकबाकीदार असा भेद न करता सरसकट सर्वांना समान अशी कर्जमाफी असावी. पहिले प्राधान्य चालू बाकीदारांना असावे. यापुढे शेतकरी कर्जबाजारी होऊ नये म्हणून शेतीमालाला  उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव कसा मिळेल यासाठी सरकारने आराखडा तयार करावा ही माफक अपेक्षा आहे, असे क्रांतीकारी शेतरकी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सत्तार पटेल, म्हणाले.
जीएसटी लागू टॅक्स कधी रद्द होणार?
१९७२ पासून लागू झालेला प्रोफेशनल टॅक्स हा रद्द करण्यात यावा.  मार्केट कमिटी टॅक्स हा रद्द करण्यात यावा. जीएसटी लागू झाल्यापासून सर्व टॅक्स रद्द होऊन जाईल, असे भाजप सरकारने सांगितलेले होते., असे मराठावाडा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दिनेश गिल्डा म्हणाले.
अर्थसंकल्प शेती, उद्योग व रोजगाराभिमुख असावा
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात झाली असून या अर्थसंकल्प अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल आज घडीला राज्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. शेतक-यांच्या मालाला बाजारात योग्य भाव नाही रासायनिक खते व बियाणेचे दर गगणाला भिडले आहेत तेंव्हा हा अर्थसंकल्प हा शेती, शेती अधारीत उद्योग व रोजगार यांना चालना देणारा असावा हीच अपेक्षा लातूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती कल्याण पाटील यांनी व्यक्त केली.
सहकार, औद्योगिक विकासाला चालना हवी
राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा सहकार क्षेत्राबरोबरच औद्योगिक विकासाला चालना देणारा असावा. सहकार व औद्योगिक विकासासाठी यंदाचा अर्थसंकल्पात निधीची भरीव तरतूद केल्यास बेरोजगारीचा प्रश्न ब-या पैकी सुटेल तसेच सहकार व औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा यंदाचा राज्याच्या अर्थसंकल्पातून आहे, असे जिल्हा सहकार बोर्डाचे चेअरमन राजकुमार पटवारी यांनी सांगीतले.
शेती व सिंचनासाठी विशेष आर्थिक पॅकेज हवे
शेती व सिंचनासाठी विशेष अर्थिक पॅकेज सोवार रोजी पासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात झाली असून या अर्थसंकल्प अधिवेशनात येत्या दोन दिवसात राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल हा अर्थसंकल्प राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला असता तर निश्चितच त्यांनी राज्यातील शेती व सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी विशेष अर्थिक पॅकेजची तरतूद केली असती दुर्देवाने ते आता आपल्यात नाहीत परंतु यंदाच्या अर्थसंक्लपातून शेती व सिंचनासाठी विशेष अर्थिक पॅकेजची अपेक्षा उदगीर तालुक्यातील शेकापूरचे चेअरमन बाळासाहेब नवाडे यांनी व्यक्त केली.
शेतक-यांना नुकसानभरपाई द्यावी
गेल्यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीची आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतक-यांना प्रति हेक्टरी १७ हजार रूपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. ती अद्याप पूर्ण झाली नाही. तसेच शेतक-यांसाठी राबवलेल्या वैयक्तिक लाभाच्या विहिर, गोठे, शेतरस्ते आदींचे बिले शासनाने अद्याप दिले नाहीत. अर्थसंकल्पात सरकारडून शेतक-यांसाठी मोठ्या योजनांची घोषणा केली जाते. परंतु या योजना आजपर्यंत कागदावरच राहिल्याचा अनुभव आहे. या थकीत योजनांचे पैसे देण्यासाठी तरतूद करावी, अशी अपेक्षा संभाजी सेनेचे नेते धर्मराज पवार यांनी व्यक्त केली.
साहित्य, संस्कृती, शिक्षण यासाठी प्राधान्य असावे
माणसाला पोटापाण्यासाठी एखादा व्यवसाय लागतो, मात्र मनाची भूक भागवण्यासाठी त्याने कलेशी जोडून घ्यायला हवे अस महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे म्हणायचे. जे व्यक्तीच्या बाबतीत लागू पडते तेच समाजाच्या बाबतीतही नेमकेपणाने लागू होते. समूह मनाचा अविष्कार म्हणजे शासन असते आणि शासनाच्या अर्थसंकल्पात या बाबींना प्राधान्याने स्थान मिळावे ही अपेक्षा आहे. जागतिकीकरण व बदलत्या  काळाच्या ओघात साहित्य, संस्कृतीला खालून मिळणारे स्थान वरच्या पातळीवर येण्याची गरज आहे. नव्या गोष्टी कशा समाविष्ट करता येतील याचा विचार व्हायला हवा. साहित्य सोबतच शिक्षणाच्या पातळीवर ही अर्थसंकल्पाने विचार करण्याची गरज आहे, असे शिक्षण व साहित्य क्षेत्राचे अभ्यासक धनंजय गुडसुरकर यांनी सांगीतले.
अर्थसंकल्प लोककल्याणकारी असावा
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा विकासाभिमुख व लोक कल्याणकारी असावा ज्यामध्ये सामाजिक शिक्षण, आरोग्य,सुरक्षा तसेच पायाभूत सुविधा यांच्यासाठी जास्त तरतूद असावी तसेच शेतकरी आत्महत्या वाढल्याने शेती व शेती आधारित उद्योग व रोजगार यांना चालना देणारा असावा. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढू नये याची काळजी घेतली जावी, अशी अपेक्षा मनसेचे लातूर जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR