37.4 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देऊ

काँग्रेसला ७ जागांवर पाठिंबा देऊ

आंबेडकरांचा प्रस्ताव ठाकरे-पवारांवरील विश्वास उडाला

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले असून, यात राज्यातील काँग्रेस पक्षाच्या ७ जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

या पत्रात म्हटले आहे की, १७ मार्च रोजी मुंबईतील ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समापन महासमारंभात तुम्हाला आणि राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला. आपण विस्तृत संभाषण करू शकलो नाही आणि म्हणूनच आज मी तुम्हाला पत्र लिहित आहे.

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही चर्चेसाठी किंवा बैठकीसाठी निमंत्रित न करता सातत्याने बैठका घेत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनी महाविकास आघाडीच्या झालेल्या अनेक बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला असून, महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या असमान वागणुकीमुळे आमचा या दोन्ही पक्षांवरचा विश्वास उडाला आहे.

वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा – फॅसिस्ट, फुटीरतावादी, लोकशाहीविरोधी भाजप-आरएसएस सरकारला पराभूत करणे. या विचाराने मी महाराष्ट्रातील ७ जागांवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचितसोबत एमआयएम युती करणार? इम्तियाज जलील यांनी स्पष्टच सांगितले
मी तुम्हाला विनंती करतो की, महाविकास आघाडीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांपैकी ७ मतदारसंघांची नावे मला द्यावीत. तुमच्या पसंतीच्या या ७ जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांना आमचा पक्ष पूर्णपणे ग्राऊंडवर आणि धोरणात्मक पाठिंबा देईल.

वंचित बहुजन आघाडीकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला दिलेला हा प्रस्ताव केवळ सदिच्छांचाच नाही, तर भविष्यात संभाव्य आघाडीसाठी मित्रत्वाचा हात देणाराही आहे, असेही या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, या प्रस्तावावर काँग्रेस काय प्रतिसाद देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR