नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून जीवन आणि वैद्यकीय विम्यावरील जीएसटी हटवण्याची मागणी केली आहे. यामुळे विमा कंपन्यांवरील आर्थिक भार कमी होईल, जीवन विम्यावरील अप्रत्यक्ष कर हा जीवनाच्या अनिश्चिततेवरील करांसारखा आहे, असे गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. सध्या जीवन आणि आरोग्य विम्यावर सुमारे १८ टक्के कर आकारला जातो.
गडकरी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, निर्मला सीतारामन यांना नागपूर विभागीय आयुर्विमा निगम कर्मचारी युनियनने विमा उद्योगाशी संबंधित समस्यांबाबत मला निवेदन दिले आहे आणि ते मला तुमच्यासमोर ठेवण्यास सांगितले आहे. युनियनने उपस्थित केलेला मुख्य मुद्दा म्हणजे जीवन आणि वैद्यकीय विम्याच्या हप्त्यांवर जीएसटी मागे घेणे: जीवन विमा प्रीमियमवर जीएसटी लादणे म्हणजे जीवन विमा प्रीमियमवर कर लादण्यासारखे आहे.
युनियनचा असा विश्वास आहे की जी व्यक्ती कुटुंबाला काही संरक्षण देण्यासाठी जीवनाच्या अनिश्चिततेची जोखीम कव्हर करते, त्याला या जोखमीवर संरक्षण खरेदी करण्यासाठी प्रीमियमवर कर लावला जाऊ नये, असे आवाहन केले आहे.
पंतप्रधान मोदींविरोधात काँग्रेसने दिली ‘विशेषाधिकारभंगाची’ नोटीस
नवी दिल्ली : भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस खासदार चरणजित सिंह चन्नी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात विशेषाधिकारभंगाची नोटीस दिली आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि जालंधरचे खासदार चरणजित सिंह चन्नी यांनी या नोटीसमध्ये दावा केला आहे की, पंतप्रधान मोदींनी अनुराग ठाकूर यांच्या भाषणातील त्या भागाचा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आला होता. चन्नी यांच्या दाव्यामुळे मोदी चांगलेच अडचणीत आले आहेत.
पंतप्रधान मोदींचे हे पाऊल सभागृहाच्या विशेषाधिकाराचे उल्लंघन आहे, असा आरोप खासदार चन्नी यांनी केला असून, लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या नोटीसमध्ये त्यांनी मोदींविरोधातील विशेषाधिकारभंगाचा माझा प्रस्ताव स्वीकारावा आणि तो सभागृहात आणू द्यावा अशी विनंती केली आहे. खरे तर भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेत असताना जात जनगणनेच्या मागणीवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यानंतर विरोधी खासदारांनी अनुराग ठाकूर यांना चांगलेच धारेवर धरले होते.
ठाकूरचे कौतुक पंतप्रधानांना पडणार महाग
दरम्यान, मंगळवारी पंतप्रधान मोदींनी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी लोकसभेत दिलेल्या भाषणाचे कौतुक केले होते आणि ठाकूर यांच्या भाषणाचा काही भाग जो सभागृहाच्या कामकाजातून हटवण्यात आला होता तो सोशल मीडियावर शेअर केला. यासोबतच मोदींनी त्याखाली पोस्ट केली की, ठाकूर यांचे हे भाषण ऐकलेच पाहिजे. यामुळे पंतप्रधानांनी लोकसभेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप खासदार चन्नी यांनी केला आहे. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.