मुंबई : प्रतिनिधी
हिरवीगार कोथिंबीर ही फक्त जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर सजावट करण्यासाठी देखील वापरली जाते. घराघरांत अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत आणि वडापावपासून ते अगदी छोट्या स्नॅक्सपर्यंत वापरली जाणारी कोथिंबीर मात्र आता जेवणातून गायब होणार आहे.
कोथिंबिरीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आवक कमी झाल्यामुळे किलोमागे २५० ते २४० रुपये मोजावे लागत आहेत. पावसाअभावी बाजारात भाजीपाल्याची आवक कमालीची घटल्याने दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. रोजच्या भाजीला चव देणारी कोथिंबीर आता थेट २४० रुपये किलोवर पोहोचली तर मेथीचे दरही १६० रुपये किलो झाले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांपूर्वी जे दर होते, त्यात आता थेट दुपटीने वाढ झाली.
आवक ५० टक्क्यांनी घटली
गेल्या आठ दिवसांत पाऊस गायब झाल्याने पालेभाज्यांची आवक मंदावली आहे. घाऊक बाजारात भाजीपाल्याची येणारी आवक ५० टक्क्यांपेक्षा जास्त घटल्याचे चित्र आहे. जळगाव बाजार समितीचा विचार केला, तर गेल्या आठवड्यात जिथे ६ क्विंटल कोथिंबिरीची आवक होती आणि भाव १२ हजार रुपये क्विंटल होता. तिथे सोमवारी केवळ १ क्विंटल कोथिंबीर बाजारात आली.
किचनचे बजेट कोलमडले
किरकोळ बाजारात सध्या कोथिंबीर ६० रुपये पाव या दराने विकली जात आहे. तर १५ ते २० रुपयांना मिळणारी मेथीची लहान जुडी आता थेट ४० रुपयांना झाली आहे. पालेभाज्या सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्याने जळगावकरांनी आता आपला मोर्चा बटाटे, मटार आणि मूग, मटकी यांसारख्या कडधान्यांकडे वळवला आहे, जेणेकरून घराचे बजेट नियंत्रणात राहील.
















