24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeअंतरराष्ट्रीयकोरोनानंतर मुलींच्या मेंदूत झपाट्याने वाढ!

कोरोनानंतर मुलींच्या मेंदूत झपाट्याने वाढ!

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेत मेंदूच्या विकासाविषयीचा एक अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासात मुलींच्या मेंदूची चाचणी करण्यात आली. त्यात असे आढळून आले की, कोरोना काळात लॉकडाउननंतर मुलींचे मेंदू अपेक्षेपेक्षा खूप वेगाने वाढत आहेत. संशोधकांनी या बदलासाठी कोरोना काळातील विलगीकरणाला जबाबदार धरले. हा अभ्यास कोरोना काळात आणि त्याआधी केलेल्या मुलींच्या चाचणीवर आधारित आहे.

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या अभ्यासात प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये कॉर्टिकल थिनिंगची चाचणी प्रकाशित करण्यात आली. ही एक अशी प्रक्रिया आहे की, जी बालपणाच्या उत्तरार्धात किंवा पौगंडावस्थेत सुरू होते. या प्रक्रियेत मेंदू निरर्थक सायनॅप्सची (दोन मज्जातंतू पेशींमधील एक लहान जागा) छाटणी करतो आणि त्याचा बा स्तर संकुचित करतो. कॉर्टेक्स थिन म्हणजेच पातळ होणे वाईट आहे, असे नाही. कारण शास्त्रज्ञ ही प्रक्रिया मेंदू परिपक्व करणारी आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवणारी आहे, असे सांगतात. परंतु तणावपूर्ण परिस्थितीत ही प्रक्रिया अधिक गतिमान होते आणि कॉर्टिकल थिनिंगच्या प्रक्रियेची गती नैराश्य आणि चिंतेमुळे वाढते.

संचारबंदी उठू लागल्यानंतर २०२१ मध्ये घेतलेल्या चाचण्यांमध्ये असे आढळून आले होते की, त्या काळात मुले आणि मुली दोघांच्याही मेंदूंची जलद गतीने वाढ होत आहे आणि कॉर्टिकल पातळ होत आहे. परंतु मुलींमध्ये याचे लक्षणीय प्रमाण दिसून आले. मुलींमध्ये कॉर्टिकल पातळ होण्याचे प्रमाण सरासरी ४.२ वर्षांनी अधिक वेगाने वाढल्याचे दिसून आले आणि मुलांमध्ये कॉर्टिकल पातळ होण्याचे प्रमाण सरासरी १.४ वर्षे अधिक वेगाने वाढत असल्याचे लक्षात आले. अभ्यासाच्या सहलेखिका पॅट्रिशिया के. कुहलच्या म्हणण्यानुसार हा निष्कर्ष सूचित करतो की, प्रयोगशाळेत आलेल्या १४ वर्षीय मुलीचा मेंदू आता १८ वर्षांच्या मुलीसारखा दिसतो.

कुहल यांनी या परिस्थितीसाठी साथीच्या रोगामुळे निर्माण झालेल्या सामाजिक वंचिततेला जबाबदार धरले. या साथीच्या रोगाचा किशोरवयीन मुलींना जास्त फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. कारण मुली परस्पर संवादावर अधिक अवलंबून असतात, असे त्या म्हणाल्या. मुली विशेषत: आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर सतत संवाद साधत असतात. हा समस्यांच्या निराकरणाचा आणि स्वत:ला तणावमुक्त करण्याचा त्यांचा एक मार्ग असतो. मात्र, कोरोना काळात यात अनेक अडथळे आले.

कॉर्टिकल पातळ
होणे समस्या नाही
कॉर्टिकल पातळ होणे ही समस्याच असू शकते, असे नाही. हे परिपक्व बदलाचे लक्षणही असू शकते, असे बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानव विकास संस्थेचे रोनाल्ड ई. डहल यांनी सांगितले. संशोधकांनी १६० मुले आणि पौगंडावस्थेतील मुलांसह या अभ्यासाला सुरुवात केली होती. या अभ्यासासाठी २०१८ मध्ये ९ ते १७ वयोगटातील मुलांची पहिली चाचणी घेण्यात आली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR