मुंबई : प्रतिनिधी
मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर करणा-या कोस्टल रोडवरील बोगद्यात एक दुर्घटना घडली. बोगद्यात एका कारने पेट घेतला. काही क्षणांतच कारला आगीच्या लोळांनी वेढले. त्यामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आग वाढतच गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी तूर्तास बंद करण्यात आला.
कोस्टल रोडच्या बोगद्यात कारने पेट घेतल्यानंतर आगीचे आणि धुराचे लोट पसरले. त्यामुळे काही वेळातच बोगदा धुराने कोंडला गेला. वाहतूक सुरू असतानाच अचानक घडलेल्या या घटनेने लोक घाबरले. कारण बोगद्यात धुरामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.
कारला लागलेल्या आगीमुळे पुढे जाणे शक्य नसल्याने आणि मागेही लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याने लोक कारमधून उतरून मागे पळत सुटले. लोक कार बोगद्यात उभ्या करून मागे पळत सुटले. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून, सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, काही काळासाठी रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
















