25 C
Latur
Saturday, October 25, 2025
Homeराष्ट्रीयखाजगी बस खाक, २५ ठार

खाजगी बस खाक, २५ ठार

दिवाळी साजरी करून परतणा-या प्रवाशांवर काळाचा घाला
कर्नूल : वृत्तसंस्था
हैदराबाद-बंगळूर महामार्गावर कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक मन हेलावून टाकणारी दुुर्घटना घडली. ‘कावेरी ट्रॅव्हल्स’च्या खासगी स्लीपर कोच बसला एका दुुचाकीने धडक दिली. या धडकेनंतर खाजगी बसने भीषण पेट घेतला. या दुर्घटनेत २५ प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला.

या खाजगी बसमधील प्रवासी गाढ झोपेत असताना मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. दुचाकीच्या धडकेमुळे बसच्या इंधन टाकीजवळ आग लागली आणि ती काही क्षणातच संपूर्ण बसमध्ये पसरली. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, प्रवाशांना बाहेर पडायलाही वेळ मिळाला नाही. बसमध्ये सुमारे डझनभर प्रवासी आपत्कालीन दरवाजातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. ज्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तातडीने कर्नूल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक रहिवासी, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. मात्र, या दुर्घटनेत २५ जणांचा बळी गेला. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. चिन्ना टेकुरजवळ झालेल्या बस अपघाताची बातमी ऐकून मोठा धक्का बसला. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींवर योग्य उपचार व्हावेत आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत मिळावी, यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

मृतांच्या कुटुंबीयांना
केंद्र, राज्याची मदत
भीषण दुर्घटनेत दुचाकीस्वारासह २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाने मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली तर आंध्र प्रदेश सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख आणि जखमींना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR