36.2 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeसंपादकीय विशेषखाण्याची धास्ती!

खाण्याची धास्ती!

निवडणुकीचा मोठा हंगाम सुरू आहे. नेत्यांकडून वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत. समोरच्याचा वाईटपणा आणि स्वत:ची महानता सांगण्याची चढाओढ सुरू आहे. आमिष आहे, आश्वासने देखील दिली जात आहेत. अशा रीतीने लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. सध्या बातम्यांत केवळ हाच उत्सव दिसून येतो. जगात जे काही घडत आहे, ते एखाद्या कोप-यात छापून येते. अशाच स्थितीत भारतातील नामांकित मसाला उत्पादक असणा-या एमडीएच आणि एव्हरेस्टच्या सांबार मसाला आणि फिश करी मसाल्यावर सिंगापूर आणि हाँगकाँग सरकारने बंदी घातली आहे. परिणामी बाजारातून संपूर्ण माल माघारी बोलावला आहे. दुस-या कोप-यात अशीही बातमी होती की, युरोपीय युनियनने काही महिन्यांतच भारताच्या ५३७ पदार्थांवर बंदी घातली आहे. मसाले आणि अन्य पदार्थांत थिलीन ऑक्साईड नावाचा रासायनिक पदार्थ असून त्यामुळे कर्करोग होऊ शकतो, असे बंदी घालताना युरोपिय युनियनने म्हटले आहे.

आणखी एका कोप-यात भारतीय कंपनीचीच बातमी होती. यात शिशूच्या आहारात साखरेचे प्रचंड प्रमाण वापरले जात असल्याचे निदर्शनास आले होते. तसेच अमेरिकेने गेल्या सहा महिन्यांत एमडीएचच्या मसाल्यांच्या शिपमेंटमधील ३१ टक्के माल हा साल्मोनला नावाचा विषाक्त पदार्थ आढळून आल्याच्या कारणावरून रोखण्यात आला. या विषाणूमुळे अतिसार, ताप यासारखे आजार होऊ शकतात. आतड्यांची देखील हानी होऊ शकते, असे म्हटले आहे. निवडणुकीचा उत्सव सुरू असताना जनतेच्या आहारात कॅन्सर होणा-या घटक पदार्थाचा समावेश असणे या बातमीला अधिक महत्त्व दिले गेले नाही. वास्तविक निवडणुका नसत्या तरी या बातम्यांनी काही गदारोळ माजला नसता. अगोदरच रामदेवबाबा यांच्या पतंजलीचे तूप, नूडल्स, मध, औषधात भेसळ आढळून आल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. त्यांच्याच कंपनीचे कोरोनानाशक औषधांचे प्रकरण अजूनही कोणत्याही निष्कर्षाप्रत पोचलेले नाही. मसाल्यांमध्ये जीवघेणे रासायनिक पदार्थ आढळून आल्याने आपली उत्पादने अनेक देशांतील नियामक संस्थांच्या रडारवर आली आहेत. परिणामी देशातील ‘एफएसएसआय’ला (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया) देखील मसाल्याची तपासणी करण्याचे आदेश काढावे लागले आहेत.

सध्याची एकंदरीत स्थिती पाहता, आहार असो वा औषधे, त्यांची शंभर टक्के हमी देता येत नाही हेच खरे. कोणत्या गोष्टीत काय पदार्थ मिसळला असेल, याचा थांगपत्ता कोणालाही नाही. आपल्याकडे ड्रग कंट्रोलर आहे, खाद्य नियामक संस्था आहे, ग्राहक मंत्रालय आहे आणि अनेक प्रकारच्या तपासणी संस्था आहेत. निरीक्षक आहेत, परवानग्या आहेत, जनतेला भेसळ शोधण्यासाठीचे उपाय सांगितलेले आहेत, यूट्यूबसारख्या माध्यमावर त्याचे व्हीडीओ आहेत, भेसळविरुद्ध अनेक कायदे अणि कडक नियम आहेत. त्यात सहा महिन्यांपासून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा अणि एक लाखापासून वीस लाखांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. सर्व काही आहे, मात्र या सर्वांमध्येही ‘भेसळ’ दिसून येते. त्यांच्या कारवाईत खोटेपणा आहे. दरवर्षी होळी, दिवाळीला हजारो टनांची भेसळ झाल्याच्या घटना समोर येतात. निकृष्ट दर्जाचे चटपटीत पदार्थ, मिठाई ही लोकांच्या माथी मारली जाते आणि त्याचवेळी ठिकठिकाणी छाप्यात पकडलीही जाते. फोटो येतात, बातम्याही छापल्या जातात. ही बाब आता सणांचा अविभाज्य भाग झाली आहे. उत्सव संपला की सर्व काही थांबते. उर्वरित वर्षात काय विकले जाते, याची कोणाला पर्वा नाही. बदलत्या काळात पनीर हा आपले राष्ट्रीय भोजन पदार्थ झाला आहे. सुग्रास जेवण हे पनीरशिवाय पूर्णच होत नाही, अशी मानसिकता आज बनली आहे. परंतु एका अहवालानुसार, बाजारात विकल्या जाणा-या ७० टक्के पनीरमध्ये शुद्धतेचा अभाव असतो.

काही महिन्यांपूर्वीच मुलांना आवडणा-या ‘बुढ्ढी के बाल’मध्ये कॅन्सरला पोषक घटक पदार्थ असल्याची बातमी आली होती. त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीत त्याच्या विक्रीला बंदी घातली. अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणा-या खाद्यतेलावरूनही बराच संभ्रम आहे. संपूर्ण जग पाम तेलापासून दूर पळते, परंतु आपण त्याला कवटाळून बसलो आहोत. रिफाइंड तेलामुळे होणारे नुकसान हे जगजाहीर आहे. दुसरीकडे बाजारात मिळणारी तेले ही त्याच तेलबियांपासून बनवलेली असतील याची हमी नाही. मोहरीचे तेल ९० रुपये किलोनेही मिळते आणि २५० रुपये किलोनेही! नागरिक तिळाचे तेल सुरक्षित असल्याचे समजून त्याचा वापर करतात. मात्र त्यावरचे इंग्रजीचे वाक्य वाचण्याचे कोणी कष्ट घेत नाहीत. तिळाच्या तेलात ८० टक्के सोयाबीन मिसळलेले असते आणि त्याचा उल्लेख असतो. फळांचे उदाहरण घेतल्यास तिथेही अशीच स्थिती आहे. कलिंगडासारख्या हंगामी फळाची देखील हमी नाही. त्याचा मोठा आकार ऑक्सिटोसिन अणि फॉरक्लोरन्यूरॉनसारख्या रासायनिक पदार्थांमुळे होतो. त्याचा लालसरपणा इरोथ्रीसीनमुळे असतो. केळी, आंबे, चिक्कू पिकवण्यासाठी काय काय केले जाते हे आता जनतेलाही माहीत झाले आहे.

एकंदरीत काय तर, भारतात कोणत्याही पदार्थाच्या शुद्धतेची हमी नाही. युरोपीय युनियनमध्ये ऑर्गेनिक शिक्का मारुन पाठविलेल्या साहित्यात कॅन्सरला पोषक असलेल्या घटक पदार्थांचा समावेश केलेला आढळत असेल तर अन्य गोष्टीबाबत काय बोलायचे? तांदूळ, सोयाबिन आणि गव्हासारख्या अन्नधान्यांपासून किंवा तूप, दूध, लोणी यासारख्या कोणत्याही दुग्धजन्य पदार्थांपर्यंत आणि मसाल्यांपासून ते फळांपर्यंत जवळपास सर्वांतच भेसळ आहे. दुधात पाणी मिसळण्यास भेसळ समजली जात नाही. युरिया, डिटर्जेटयुक्त दुधाची देखील चर्चा होत नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे, अशा प्रकारचे अन्नपदार्थ पोटात गेल्यानंतर आजारी पडल्यास औषधे घ्यावीत तर त्याबाबतही धास्ती आहे. आपल्याकडे जगातील सर्वोत्तम औषधी असल्याचे सांगितले जाते. परंतु आपले कफ सिरप, डोळ्यांचे औषध यांपासून कॅन्सरच्या औषधापर्यंत अनेक औषधे सदोष असल्याचे उघड झाले आहे आणि मागील काळात काही देशांनी त्यावर बंदीही घातली आहे. सरकारकडून पुरवल्या जाणा-या जेनरिक औषधांच्या गुणवत्तेवरून संशय अकारण व्यक्त केला जात नाही.

– योगेश मिश्र,
ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR