लातूर : प्रतिनिधी
लातुरकरांना गेल्या काही वर्षात मनपातील प्रशासकीय राजवटीचा अनुभव फारसा चांगला नसल्याचे निदर्शनास आणुन देत शहरवासीयांना आता नगरसेवकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या अपेक्षापूर्तीसाठी मनपा पदाधिका-यांनी आराखडा तयार केलेला आहे. या आराखड्यानुसार लातूरकरांना गतिमान आणि सुलभ नागरी सुविधा देण्यासाठी मनपा प्रशासनाने तत्परतेने काम करावे, अशी सुचना स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी केली आहे. मनपाच्या विविध विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेताना सचिन बंडापल्ले यांनी ही सुचना केली आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, उपायुक्त वसुधा फड, सहायक आयुक्त खदीर शेख, नंदकिशोर तावडे, बंडू राजूरे, शहर अभियंता उषा शिंदे, पाणी पुरवठा अभियंता विजय चव्हाण, सहा.संचालक नगररचना महाजन आदींची उपस्थिती होती.
मनपाच्या विद्युत देयकात बचत व्हावी यासाठी सौर ऊर्जेचा वापर अधिकाधिक व्हावा, असे अपेक्षीत असुन मनपाच्या सर्व इमारतीवर सोलार बसवण्यासाठी मेडाकडे प्रस्ताव पाठवून त्यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावासाठी पाठपूरावा करावा असे निर्देश सचिन बंडापल्ले यांनी यावेळी दिले. शहरातील सर्व पथदिवे सुरळीतपणे चालू राहण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व यंत्रणेने तत्परतेने काम करावे असे सांगुण शहरात मनपाच्या वतीने जी बस सेवा देण्यात येते ती सुरळीत चालु ठेवावी अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली, त्याच बरोबर नादुरुस्त असलेल्या बसेस तात्काळ दुरुस्त करुन त्या सेवेत दाखल कराव्या अशी सूचना केली. मनपाच्या वतीने शहरातील महिलांसाठी मोफत बस सेवा असुन याकरीता आत्ता पर्यंत ८ हजार ५०० स्मार्ट कार्ड वाटप झालेले असून प्रस्तावित असलेले आणखीन ३० हजार स्मार्ट कार्ड वाटप करण्यासाठी तात्काळ आराखडा तयार करावा असे निर्देश दिले आहेत.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी शहरातील सर्व सीसीटिव्ही कॅमेरे सुरु करण्यासाठी निर्देश देऊन लातूरकरांचा मनपाच्या ऑनलाईन सेवेस चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लवकरात लवकर ई- प्रशासन चालु करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या. शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होत असुन त्या वृक्षांच्या संवर्धनासाठी त्यांना ट्री गार्ड बसवून त्यावर नंबर देण्यात यावे असे सुचित करण्यात आले. मनपाची शहरात २२ आरोग्य केंद्र असून त्या ठिकाणी नागरीकांना दर्जेदार आरोग्य सुविधा व सेवा मिळावी यासाठी प्रशासनाने गांभिर्याने काम करणे अवश्यक असल्याचे सांगुन दिपजोती नगर येथे सुरु असलेल्या आरोग्य केंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सुचना केली.
लातूरकरांना जन्म, मृत्यू प्रमाण पत्र विनाविलंब मिळावे, असे निर्देश देऊन ज्या प्रमाण पत्रांमध्ये चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी राखीव वेळ ठेवण्याची सुचना सचिन बंडापल्ले यांनी केली. नगर रचना विभागातील प्रलंबीत सर्व प्रकरणे तात्काळ मार्गी लावून बांधकाम परवान्या प्रमाणेच गुंठेवारी प्रक्रिया ही ऑनलाईन करावी अशी सुचना केली. घरकुल लाभार्थ्यांचे देयक हप्ते तात्काळ अदा करण्याच्या सुचना करुन मनपा शाळेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक असणा-या उपाय योजना कराव्यात असे निर्देश दिले. स्वच्छता विभागाच वतीने लवकरात लवकर मानसुनपूर्व नालेसफाई करावी असे निर्देश देऊन कचरा वाहतूक करणा-या वाहनांवर ग्रीन जाळी बसवावी. अशी सूचना केली. शहरातील पार्कींग झोन ची माहिती वाहनधारकांना मिळण्यासाठी आवश्यक असणारी प्रसिद्धी करुन त्याठिकाणी पार्कींग पट्टे रंगवण्याचे निर्देश देण्यात आले.
लातूरकारांच्या अपेक्षापूर्ती साठी मनपा पदाधिका-यांच्या वतीने नियोजन आराखडा तयार करण्यात येत असून त्या अनुशंगाने शहरातील नागरीकांना मनपाच्या वतीने देण्यात येणा-या सुविधा व सेवा गतीमान पध्दतीने मिळण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे अशी सूचना करुन यामध्ये कोणताही विलंब अथवा तडजोड करु नये, असे निर्देश स्थायी समिती सभापती सचिन बंडापल्ले यांनी दिले. या बैठकीस मनपाचे विविध विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

