निलंगा : लक्ष्मण पाटील
पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने निलंगा तालुक्यात दुष्काळाची तीव्रता वाढली असून, त्याचा मोठा फटका शेतमजुरांना बसत आहे. पाण्याअभावी खरिपाची पिके वाळून गेल्याने शेतीतील कामे ठप्प झाली आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळणे कठीण झाले असून, उदरनिर्वाहासाठी गाव सोडून शहरांकडे स्थलांतर करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
खरिपाच्या हंगामात शेतातील मशागत, आंतरमशागत, खुरपणी, काढणी यांसारख्या कामांतून शेतमजुरांना रोजगार मिळतो. मात्र, पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिके कोमेजली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरीही आर्थिक संकटात सापडले आहेत. उपलब्ध शेतीची कामे कुटुंबातील सदस्यांकडूनच करून घेतली जात असल्याने मजुरांना रोजगार मिळण्याच्या संधी आणखी कमी झाल्या आहेत. दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावात रोजगार उपलब्ध होत नसल्याने अनेक मजूर कामाच्या शोधात शहरांकडे धाव घेत आहेत. गावातील रोजगाराच्या संधी कमी झाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत.
११,६२० मजूर कामावर
निलंगा तालुक्यात ३७,२२३ मजुरांची नोंदणी; प्रत्यक्ष कामावर ११,६२० निलंगा तालुक्यात ३७ हजार २२३ नोंदणीकृत मजूर असून, त्यापैकी ११ हजार ६२० मजूर सध्या कामावर आहेत. मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध ३७६ योजनांअंतर्गत कामांची तरतूद आहे. त्यापैकी सध्या सात प्रकारची कामे सुरू आहेत. याशिवाय चारा लागवडीची कामे सुरू करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत, अशी माहिती गटविकास अधिकारी सतीश पाटील यांनी ‘एकमत’शी बोलताना दिली.
















