लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरात आणि ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलिंडर वितरणात मोठा गोंधळ आणि अनियमितता सुरू असल्याचा गंभीर आरोप होत आहे. नागरिकांनी नियमितपणे गॅस बुकिंग करूनही वेळेत सिलिंडर मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संभाजी सेनेच्या पदाधिका-यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, गॅस एजन्सींचा मनमानी कारभार तात्काळ थांबवावा, अन्यथा पुढील पाच दिवसांत तीव्र आंदोलन छेडले जाईल.
अनेक गॅस एजन्सी बुकिंग असूनही ग्राहकांना वेळेत गॅस पुरवठा करत नाहीत. उलट, काही ठिकाणी काळाबाजार करून अधिक दराने सिलिंडर विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, शासनाच्या नियमांचे उघड उल्लंघन होत आहे. या प्रकारामुळे प्रशासनाची दिशाभूल केली जात आहे. संबंधित गॅस एजन्सींची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांचे लायसन्स तात्काळ रद्द करण्यात यावे. तसेच, नागरिकांना वेळेत गॅस मिळावा यासाठी कडक नियंत्रण ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडूनही कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासनाने वेळेत योग्य निर्णय घेतला नाही, तर संभाजी सेना प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करील असा इशारा दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष योगेश देशमुख, विद्यार्थी आघाडी अध्यक्षअमोल कांदे, शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यपाल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत माने, गजानन मुंगळे जिल्हा सचिव, रितेश चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी आघाडी, आधी इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

