27.8 C
Latur
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रचंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात मागच्या निवडणुकीप्रमाणे यंदाही तिरंगी सामना रंगणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सुटल्याने काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते आणि सांगलीची जागा मविआच्या जागावाटपात काँग्रेसला मिळावी, यासाठी तब्बल तीन महिने प्रचंड धावपळ करणारे आमदार विश्वजीत कदम हे आता काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र कदम यांनी आता आपली भूमिका स्पष्ट करत मविआ उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रहार पाटील यांच्या प्रचारानिमित्त विश्वजीत कदम हे आमदार असलेल्या पलूस तालुक्यात नुकतीच एक बैठक पार पडली.

विश्वजीत कदम हे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाल्याने विशाल पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. कारण कदम यांची पलूस-कडेगावसह संपूर्ण सांगली जिल्ह्यात चांगली ताकद आहे. पलुस इथे झालेल्या बैठकीविषयी स्वत: चंद्रहार पाटील यांनी आपल्या फेसबुक पेजवरून माहिती दिली आहे. आज खटाव, ब्रम्हनाळ, माळवाडी, भिलवडी ता.पलूस येथे माजी मंत्री विश्वजीत कदम, आ.अरुण आण्णा लाड, महेंद्र लाड, शरद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली असे पाटील यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, विशाल पाटील यांच्या रुपााने महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याने मतविभाजन होऊन भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांना फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवर नक्की कोणाचा विजय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

विश्वजीत कदमांची भूमिका महत्त्वाची
महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वादंग उठले. अखेर मविआमध्ये बंडखोरी होऊन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली आहे. उद्धवसेनेने पैलवान चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा हट्ट शेवटपर्यंत सोडला नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, अशी एकास एक लढत होण्याऐवजी तिरंगी झाली. खासदार संजय पाटील यांच्यासह भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची व काँग्रेससाठी अस्तित्वाची आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभेसाठी उद्धवसेनेने अचानक प्रवेश घेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्याची घाई केली.

त्यामुळे या जागेसाठी काँग्रेसचे विश्वजित कदम व विशाल पाटील यांनी संघर्ष केला. मात्र, वरिष्ठ नेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. उमेदवारीसाठी काँग्रेसचा ‘एबी फार्म’ न मिळाल्याने विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. सांगलीच्या जागेच्या संघर्षामुळे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील व डॉ. पतंगराव कदम या दोन्ही घराण्यांतील वाद मिटला. जिल्ह्यातील काँग्रेस एकवटली; पण ही जागा उद्धवसेनेला गेली. त्यामुळे विश्वजित कदम हे आघाडीधर्म पाळणार की बंडखोरीला साथ देणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र आता कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण आघाडी धर्माचे पालन करणार असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR