मुंबई : वृत्तसंस्था
मेडिकल सायन्समधील एक अचंबित करणारं प्रकरण समोर आलं आहे. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एका गावात अत्यंत दुर्मीळ केस उघडकीस आली. चार दिवसांपूर्वी जन्म झालेल्या एका नवजात बाळाच्या गर्भात जिवंत भ्रूण असल्याचे सांगितले जात आहे.
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील केसली ब्लॉक भागात एका महिलेची चार दिवसांपूर्वी प्रसुती झाली होती. तिच्या नवजात बाळाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळाच्या सीटी स्कॅनमध्ये नवजात बाळाच्या गर्भात आणखी एक गर्भ असल्याचं समोर आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, बाळाच्या पोटातील भ्रूणदेखील जिवंत आहे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी नवजात बाळाचे परीक्षण केले आहे. बुंदेलखंड मेडिकल कॉलेजच्या रेडियोलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांच्या करिअरमधील ही पहिलीच केस आहे.
सर्जरीचा एकमेव पर्याय : तेथील एका तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फीटस इन फीटूच्या दुर्मीळ प्रकरणात बाळाच्या पोटातील भ्रूण जिवंत राहू शकत नाही. आतापर्यंतच्या इतिहासात अशी एकही केस समोर आलेली नाही. बाळाचं शरीर खूप लहान असतं आणि गर्भात भ्रूणाला पुरेसा रक्तपुरवठा, अन्य पोषक द्रव्य मिळू शकत नाही. ज्यामुळे भ्रूण जिवंत राहू शकत नाही. अशावेळी सर्जरी करून बाळाच्या पोटातील भ्रूण बाहेर काढावं लागते.