वैद्यकीय व्यवसाय ही एक सेवा आहे आणि त्याच भावनेने त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे पण आज काल सर्व काही बदलून गेले आहे सेवा भावना लोप पाऊन केवळ व्यवसाय उरला आहे आणि मग त्यातील बरे वाईट सर्व काही रुग्ण यांचे वाट्याला येते! आणि मग या सेवेतील त्रुटी करिता अगदी ग्राहक मंच किंवा न्यायालयात जाणेची वेळ बिचाऱ्या रुग्णावर येते या गोष्टीला अपवाद म्हणून नुकतेच दिवंगत झालेले डॉक्टर सुरेश उर्फ एस. एस. कुलकर्णी यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल.
धाराशिव जिल्यातील एका छोट्या गावातून लातूरला ४० वर्षांपूर्वी डॉक्टर आले आणि नांदेड रोडला आपला दवाखाना सुरू केला. रुग्णांची सेवा करायची त्यांना बरे करायचे हे त्यांचेवर झालेले संस्कार त्यांनी शेवट पर्येंत जपले. पैसा मिळवणे हा त्यांचा कधीच हेतू नव्हता. सर्व थरातील सर्व जाती धर्मातील अगदी लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्ती पर्येंत पेशंट त्यांचे कडे येत आणि बरे होऊन जातं!एखादा गरीब त्यांचे कडे उपचारासाठी आला तर त्याचे कडून फी न घेता उलट आपले कडील औषधे गोळ्या त्याला देत. त्यामुळे समस्त रुग्ण वर्गात त्यांची प्रतिमा देवा समान होती.
अनावश्यक तपासण्या किंवा चाचण्या सोनोग्राफी हे अगदी गरज असेल तरच डॉक्टर साहेब सुचवत नाहीतर नाडी परीक्षा आणि स्वतःची अशी वेगळी तपासणी पद्धत यामधून ते उपचार करत आणि त्यांचा हातगुण अचूक होता. त्यांच्याकडे आलेला पेशंट बरा होत होता. त्यामुळे डॉक्टर दवाखान्यात जाणेपूर्वी पेशंट त्यांची वाट पाहत थांबून असत आणि रात्री कितीही उशीर झाला तरी डॉक्टर शेवटचा पेशंट बघून मगच घरी येत. त्यांना कोणी अपरात्री फोन केला तरी त्या रुग्णाला ते मार्गदर्शन करत असत!डॉक्टर अगदी मनमोकळ्या स्वभावाचे होते पेशंट बरोबर छान बोलून ते काऊन्सिलिंग करत आणि तो रुग्ण तणाव रहित होऊन जाई आणि अर्थात उपचाराचा सकारात्मक परिणाम होऊन पेशंट लवकर बरा होई!ही डॉक्टर यांची खासियत होती. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमातून रुग्णसेवा केली ती ही अगदी मोफत..
कुलकर्णी सर एक उत्तम मित्र होते त्यांचा फार मोठा मित्र परिवार होता. त्यांचे मनमोकळे आणि मिस्कील बोलणे उमदे व्यक्तिमत्व यामुळे ते मित्र परिवाराचे लाडके होते. डॉक्टर उत्तम साहित्यिक होते त्यांचे दांडगे असे वाचन होते. त्यांची झुंज ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्याची पहिली आवृत्ती लगेच संपली होती. त्यांनी फुलझडी हा चारोळी संग्रह लिहिला तोही लोकप्रिय ठरला. डॉक्टर साहेब लंडनला आपले मुलीकडे गेले होते. त्या अनुभवावर लंडन वारी हे प्रवास वर्णन वर पुस्तक लिहिले अगदी खुसखुशीत अशा भाषेतील हे पुस्तक ही लोकांना मनापासून आवडले!तेजरासं वेगळं म्हणून चालू घडामोडीवर भाष्य करणाऱ्या कविता लिहीत आणि आपल्या मित्रांचे ग्रुप वर पाठवीत त्याला फार चांगला प्रतिसाद मिळत होता.
एक बहुआयामी अभ्यासू सेवाभावी मित्रप्रेमी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते!काळाने अचानक घाला घालून डॉक्टर साहेबांना आमचे पासून हिरावून नेले. म्हणतात नाजो आवडतो सर्वाना तोचि आवडे देवाला हेच खरे आहे. त्यांचा समृद्ध वारसा त्यांचे बंधू श्री दिलीप राव आणि चिरंजीव डॉक्टर मयूर हे समर्थपणे चालवतील हा विश्वास आहे! आदरणीय डॉक्टर कुलकर्णी साहेब यांना विनम्र आदरांजली…
अभय करंदीकर, लेखक, कवी, लातूर