30.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्र‘चारशे पार’ तर रोज सभा कशासाठी?

‘चारशे पार’ तर रोज सभा कशासाठी?

आंबेडकरांची भाजपच्या घराणेशाहीवरून फटकेबाजी

जालना – लोकसभा निवडणुकीत भाजपतर्फे ‘चारशे पार’चा नारा दिला जात आहे. ‘चारशे पार’ होणार असेल, तर प्रत्येक दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा का घेत आहेत? या निवडणुकीत मोदी दोनशेच्या आत आहेत, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

लोकसभेच्या जालना मतदारसंघातील ‘वंचित’चे उमेदवार प्रभाकर बकले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले, तर ते देशाचे संविधान बदलणार आहेत. याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने एका मुलाखतीमध्ये दिली आहे. २०१४ पासून पंतप्रधानांचे कार्यालय वसुलीदारांचे कार्यालय झाले आहे. ‘ईडी’सह विविध तपास यंत्रणांकरवी चौकशा लावून अनेकांकडून तिजोरीत पैसे जमविले.’

कोरोनाकाळात जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनला देशात परवानगी देऊन अनेकांना मृत्यूच्या दारात घेऊन जाण्याचे काम भाजप सरकारने केले. मात्र, यावरही काँग्रेस काही बोलण्यास तयार नाही. कारण राहुल गांधी, सोनिया गांधी यांचीही काही प्रकरणांत चौकशी सुरू आहे. आजच्या स्थितीला राजकीय घराणेशाही जबाबदार आहे, तेवढेच मतदारही जबाबदार आहेत. आता काँग्रेसपाठोपाठ भाजपही घराणेशाही चालवीत आहे. लोकशाही वाचविण्यासाठी कोणाला मत द्यायचे, याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

मराठवाड्यातही घराणेशाही
फुलंब्री – मराठवाड्यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या सर्वच पक्षांत घराणेशाही आहे. या घराणेशाहीच्या हाती सतत सत्तेच्या चाव्या आहेत. त्यामुळे मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही, असा आरोप आंबेडकर यांनी येथील सभेत केला. यावेळी अमित भुईगळ, उमेदवार प्रभाकर बकले, छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार अफसर खान उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR