26.4 C
Latur
Friday, October 31, 2025
Homeमहाराष्ट्रचार मंत्र्यांच्याच मतदारसंघात अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

चार मंत्र्यांच्याच मतदारसंघात अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

नाशकात कांदा उत्पादक संकटात

नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडले आहेत. राज्य शासनाने त्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी पॅकेजच्या लाभापासून दूरच आहेत. नाशिक जिल्ह्यात कांदा पीक सतत अडचणीत असते. यंदाच्या अतिवृष्टीने अधिक संकटात असलेल्या कांदा उत्पादकांना दुसरा शॉक बसला आहे. द्राक्षांसह बहुतांशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना मदतीची घोषणा केली होती. त्यासाठी सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले. त्यात अतिवृष्टीग्रस्त शेतक-यांना मदत देण्यात येत आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात चार मंत्री आहेत. यातील बहुतांश मंत्री राज्यभर विविध प्रश्नांवर आवाज उठवतात. राज्याचा कारभार हातात. मात्र त्यांच्या स्वत:च्याच मतदारसंघात परिस्थिती विपरीत आहे.

नाशिक जिल्ह्यात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. फार्मर्स आयडी आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे शेतक-यांना मदत मिळालेली नाही. बहुतांश शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याने असंतोषाचे वातावरण आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शेतकरी त्रस्त आहेत. येथील ६२,७९८ शेतक-यांना निसर्गाचा दणका बसला. यातील अवघ्या ८,४५७ शेतक-यांना मदत मिळाली. ५४,३१४ शेतकरी अद्यापही फार्मर्स आयडीअभावी मदतीपासून वंचित आहेत.

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघातही स्थिती वेगळी नाही. येथे १४,७०५ शेतक-यांचे नुकसान झाले. यातील ६,३५९ शेतक-यांना मदत मिळाली, ८,३४६ शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर शेतकरी शासनाच्या मदतीसाठी टाहो फोडत आहेत. येथील ८७,१११ शेतक-यांवर निसर्गाची अवकृपा झाली. यातील अवघ्या २६,७०३ शेतक-यांना मदत मिळाली. ६०,४०८ शेतकरी तांत्रिक पूर्तता करण्यात कमी पडल्याने मदत मिळाली नाही. एकंदरच राज्यभर ही स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात तीन लाख ५ हजार शेतक-यांचे नुकसान झाले मात्र आतापर्यंत अवघ्या एक लाख १३ हजार शेतक-यांनाच मदत मिळाली आहे.

राज्याचे नेतृत्व करणा-या मंत्र्यांनाच आपल्या मतदारसंघातील शेतक-यांना शासकीय समन्वय निर्माण करून देण्यात यश आलेले नाही. त्याचा फटका थेट शेतक-यांना बसला आहे. पंचनामा झाल्यानंतरही अतिवृष्टी झाल्याने शेतकरी पूर्णत: खचला आहे. आता त्याच्या मार्गात शासकीय मदतीसाठी फार्मर्स आयडीच्या अडथळ्यांची शर्यत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR