पुणे : प्रतिनिधी
जीई एरोस्पेस कंपनीच्या चाकणमधील प्रकल्पातून विमान इंजिनांसाठी महत्त्वाच्या सुट्या भागांची निर्मिती केली जात आहे. या भागांचा वापर करून तयार करण्यात आलेल्या इंजिनचा पुरवठा जगभरातील विमान कंपन्यांना केला जात आहे. या सर्व कामांचे नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) उपयोग करण्यात येत असल्याची माहिती जीई एरोस्पेस कंपनीच्या जागतिक निर्मिती प्रक्रिया व पुरवठा साखळीचे कार्यकारी संचालक अमोल नागर यांनी
दिली.
जीईचा पुण्यातील चाकणमधील प्रकल्प २०१४ मध्ये सुरू झाला. त्याच्या दशकपूर्तीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी कंपनीने या प्रकल्पात २४० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतात सेवेत असलेल्या १ हजार ४०० विमानांमध्ये जीईची इंजिन वापरली जातात. जगातील प्रमुख विमान कंपन्यांकडून जीईच्या इंजिनचा वापर केला जात आहे. विमानांच्या इंजिनना मागणी वाढल्यास सुट्या भागांचीही मागणी वाढली आहे. यासाठी कंपनीने चाकणमधील प्रकल्पाच्या उत्पादन क्षमतेचा विस्तार करत आहे. याबाबत नागर म्हणाले, पुण्यातील प्रकल्पातून बाहेर पडणा-या सुट्या भागांचा वापर लीप, जीईएनएक्स आणि जीई9एक्स या विमान इंजिनसाठी केला जातो. या प्रकल्पात केवळ कर्मचा-यांनाच नव्हे तर अभियांत्रिकी पदविकेच्या विद्यार्थ्यांनाही कौशल्य विकासाचे धडे दिले जात आहेत. आतापर्यंत ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना विमाननिर्मिती क्षेत्राचे प्रशिक्षण दिल्याची माहिती जीई एरोस्पेसच्या चाकण प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विश्वजित सिंह यांनी
दिली.
















