35.8 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसंपादकीय विशेषजनता रस्त्यावर, नेते रथावर

जनता रस्त्यावर, नेते रथावर

सध्याच्या काळात नेते आणि पक्षाला सभेसाठी गर्दी जमवणे किती अवघड असते, हे कळून चुकले आहे. खर्च देखील किती होतो, हे देखील त्यांना चांगलेच ठाऊक असते. शहरात कोणाकडेच वेळ नाही आणि एखाद्या कोप-यात आयोजित सभेला जावे एवढी उत्सुकता शहरातील नागरिकांना नसते. शहरात सभा आयोजित करणे महागडे ठरते. खर्चाचा हिशेब द्यावा लागतो. या सर्व भानगडीपासून वाचण्यासाठी साधा आणि सोपा उपाय म्हणजे रोड शो. या शो दरम्यान क्रेनच्या मदतीने भलामोठा हार नेत्याच्या गळ्यात घातला जातो. जनतेने टाकलेल्या फुलांव्यतिरिक्त जेसीबीभरून फुले टाकली जातात. यात ना भाषण असते ना मिरवणूक. रोड शोंचे बदलते स्वरूप पाहता आता त्यांच्या राजकीय रोड शोसाठी एका पुरस्काराचे आयोजन करायला हवे. कारण यात अ‍ॅक्शन, ड्रामा, उत्सुकता, विनोद, नाट्य, रहस्य, कौटुंबिक नाट्य अशा सर्व कला पहावयास मिळतात.

निवडणुकीचा हंगाम सुरू होताच वेगवेगळ्या प्रकारचे शो आपल्याला पहावयास मिळतात. माध्यमांतील चर्चासत्र, नेत्यांचे परिसंवाद आणि राजकीय पक्षांचे शो असे नानाविध कार्यक्रम दिसतात आणि यात प्रेक्षक असते जनता. या सर्व कार्यक्रमांतही सर्वाधिक चर्चा असते ती ‘रोड शो’ची. एखाद्या मतदारसंघातील महत्त्वाच्या भागात ‘रोड शो’चे आयोजन केले जाते. ही एक प्रकारे एक्सक्लुझिव्ह घटना असते. आमच्या मते हा एक नावीन्यपूर्ण प्रकार आहे. परंतु सध्याच्या रोड शोचे स्वरूप पाहिले तर ते साजेसे वाटत नाही. यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात रोड शो झाले आहेत. परंतु आता या नावावर वेगळेच कार्यक्रम जनतेसमोर सादर केले जात आहेत. निवडणुकीच्या हंगामात रोड शोचा अर्थ नेते, उमेदवार यांची मुख्य, प्रमुख मार्गावरून भ्रमंती. रोड शो हे नाव अगदी अचूक वाटते. कारण हा शो रस्त्यावरच केला जातो.

नेतेमंडळी सजविलेल्या रथात, गाड्यांवर एखाद्या राजा-महाराजाप्रमाणे उभे राहून जनतेला दर्शन देतात आणि शहरातील महत्त्वाच्या मार्गावरून जातात. मागे गाड्यांचा भलाभोठा ताफा असतो. सुरक्षा रक्षकांची फौज असते. नेत्यांवर फुलांचा वर्षाव होतो. या रोड शो दरम्यान क्रेनच्या मदतीने भलामोठा हार नेत्याच्या गळ्यात घातला जातो. जनतेने टाकलेल्या फुलांव्यतिरिक्त जेसीबीभरून फुले टाकली जातात. हा खेळ दोन ते तीन किलोमीटर चालतो आणि समारोप होतो. यात ना भाषण असते ना मिरवणूक. केवळ नेत्यांकडून अभिवादन केले जाते, नमस्कार केला जातो. रोड शोचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ शहरात विशेषत: महानगरातच आयोजित केले जातात. दुसरीकडे गावात, खेडोपाडी, दुर्गम भागात रोड शो ऐवजी सभांचे आयोजन केले जाते. या ठिकाणी नेतेमंडळी ‘पवन यान’ म्हणजेच हेलिकॉप्टरने उतरतात आणि भाषण देऊन पुढे जातात. तेथे रोड शो होत नाहीत. काही नेते कधी कधी ग्रामीण भागात पदयात्रा काढतात, परंतु त्याचे प्रमाण खूपच कमी आहे आणि कालांतराने ते इतिहासजमाही होईल. शहरांची गोष्ट वेगळी आहे. तेथे झगमगाट असतो, रौनक असते. तेथे रॅली किंवा सभा नाही तर रोड शो होतो. एखाद्या निवडणूक मॅनेजमेंटने ठरवून दिलेल्या कार्यक्रमपत्रिकेनुसार सर्वकाही पार पाडले जाते.

सध्याच्या काळात नेते आणि पक्षाला सभेसाठी गर्दी जमवणे किती अवघड असते, हे कळून चुकले आहे. खर्च किती होतो, हे देखील त्यांना चांगलेच ठाऊक असते. शहरात कोणाकडेच वेळ नाही आणि एखाद्या कोप-यात आयोजित सभेला जावे एवढी उत्सुकता शहरातील नागरिकांना नसते. शहरात सभा आयोजित करणे महागडे ठरते. खर्चाचा हिशेब द्यावा लागतो. या सर्व भानगडीपासून वाचण्यासाठी साधा आणि सोपा उपाय म्हणजे रोड शो. कोणत्याही गर्दीच्या ठिकाणचा रस्ता निवडा. तेथे हजारो नागरिक अगोदरपासूनच असतात. रस्त्यावर झेंडे, फुलं आणि बॅनरची व्यवस्था झाली की झाला रोड शो. गर्दीचे ठिकाण असल्याने नागरिक रस्त्यावर असतातच. कमी खर्चात पक्षाचे ध्येय पूर्ण होते. गल्लीत पदयात्रा काढण्याची गरज नाही आणि लोकांचे टोमणे ऐकण्याचाही ताण नाही. केवळ रथावर उभे राहून अभिवादन करणे एवढेच काम. पादचारी आणि दुकानदारांचेही मनोरंजन होते आणि त्यांना पाहण्याची संधी देखील मिळते.

मनोरंजनाचा विषय निघाला तर रोड शोची संकल्पना ही सर्वप्रथम कलाकारांकडून मांडली गेली आहे. शहरातील रस्त्यावर फिरून आयोजित केल्या जाणा-या नाचगाण्याच्या कार्यक्रमाला रोड शो म्हटले जायचे. जुन्या काळात चित्रपटाचा प्रसार करण्यासाठी रिक्षावर भोंगा लावून तो गल्लोगल्ली फिरवला जायचा. त्यालाही रोड शो म्हटले जायचे. फिरणारा सर्कस किंवा मनोरंजननगरी देखील रोड शोचाच प्रकार आहे. कंपनीचा आयपीओ म्हणजे शेअर लाँच करताना देखील अशाच प्रकारे प्रचार व्हायचा किंवा बाहेरील देशातील गुंतवणूक करणा-या मंडळींना आकर्षित करण्यासाठी रोड शो सारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले जायचे. सर्व ठिकाणी अशाच प्रकारची सिस्टीम पहावयास मिळते. आता हीच गोष्ट नेत्यांनी राजकीय प्रचारासाठी अंगीकारली आणि त्याला रोड शो असे म्हटले जात आहे. रोड शो हा केवळ भारतापुरताच मर्यादित नाही. त्याचे आयोजन अमेरिकेतही होते. फरक एवढाच की आपल्याकडे रस्त्यावर नेते रथावर उभे राहून अभिवादन करतात, परंतु अमेरिकेत नेते मात्र वेगवेगळ्या शहरात जाऊन तेथील सभागृहात किंवा लहान मैदानावर जनतेशी थेट संवाद साधतात. आपली भूमिका मांडतात. यावर्षी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या राज्यांत आणि शहरांत समर्थकांसमोर प्रचार करत आहेत, त्याला रोड शो असे म्हटले जाते.

वेळोवेळी आपण काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते आसामपर्यंत आणि याशिवाय अनेक मोठ्या पक्षांचे वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजक रोड शो पाहिले आहेत. राजकीय नेत्यांनी या शोमध्ये दमदार कामगिरी केली आणि यातही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. किती गर्दी जमवायची, किती तयारी करायची, किती लोक येणार यासाठी सर्व नियोजन केले जाते. प्रारंभीच्या काळात रोड शोसाठी चित्रपट कलाकारांना आणले जात असे. आता त्यांचेही आकर्षण कमी झाले आहे. रोड शोमध्ये चित्रपट कलाकार कमीच झाले आहेत. पण स्टार नेते किंवा स्टार प्रचारकच सेलिब्रेटी ठरत आहेत, कलाकार आहेत. वास्तविक नेता हाच सर्वांत मोठा अभिनेता असतो. आता त्यांच्या राजकीय रोड शोसाठी एका पुरस्काराचे आयोजन करायला हवे. कारण यात अ‍ॅक्शन, ड्रामा, उत्सुकता, विनोद, नाट्य, रहस्य, कौटुंबिक नाट्य अशा सर्व कला पहावयास मिळतात.
भारतात राजकारणात रोड शो कोणी आणला किंवा असा ड्रामा कोणी सुरू केला, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. तर नाव ऐकून घ्या, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी. त्यांनीच या प्रकारच्या कार्यक्रमांना सुरुवात केली. निवडणुकीच्या काळात त्यांनी दिल्ली अणि रायबरेली येथे खुल्या जीप किंवा मोटारीत उभे राहून रस्त्यावर फिरण्यास सुरुवात केली. याप्रकारे ती रोड शोची पायाभरणी होती. त्यांनी रायबरेली येथे मुलगा राजीव अणि सून सोनिया यांना सोबत घेत खुल्या जीपमध्ये रस्त्यावर रोड शो केला होता. अशा प्रकारच्या रोड शोमध्ये इंदिरा गांधी या गळ्यातील फुलांचा हार लोकांवर फेकत असत. त्याला प्रसाद मानत तो हार पकडण्यासाठी जनतेची झुंबड उडायची. तेव्हा त्याला रोड शो म्हटले जात नसे. कदाचित काही नाव देखील नसेल. परंतु आता हे सर्व शो आहेत. त्याचे रोड शो असे नामकरण झाले आहे.

-योगेश मिश्र, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR