33.1 C
Latur
Monday, May 20, 2024
Homeसंपादकीयशरदरावांचा ‘यॉर्कर’

शरदरावांचा ‘यॉर्कर’

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे(शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. शरद पवारांच्या वक्तव्यावरून अनेक राजकीय तर्क लावले जात आहेत. काँग्रेसने या वक्तव्याचे स्वागत व समर्थन केले आहे, तर भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील. प्रादेशिक पक्षांना त्यांचा पराभव लक्षात आला आहे. त्यांचे अस्तित्व टिकवायचे असेल तर त्यांना काँगे्रसमध्ये जावेच लागेल. त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होईल. त्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत पवार यांनी लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे म्हटले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात कोणताही फरक दिसत नाही.

वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरूंची विचारसरणी मानणारे आहोत, हे त्यांचे वक्तव्य दोन्ही काँगे्रसच्या विलीनीकरणाचे संकेत असल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आमच्या पचनी पडणे अवघड आहे असेही पवार म्हणाले. येणारा काळ राजकीय स्थित्यंतराचा असेल असे सांगून पवार म्हणाले, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचारदेखील समविचारी पक्षांसोबत एकत्र काम करण्यासंबंधी सकारात्मक आहेत. मी त्यांची विचारसरणी जवळून पाहिली आहे. लोकसभेची निवडणूक सुरू असताना शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या हेतूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांची मशाल विझवायची आहे का, अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे अजून शिल्लक असताना पवार यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे मतदारांच्या मनात ठाकरे गटाबद्दल संभ्रम निर्माण झाल्याने ते त्यांना मतदान करणार नाहीत. परिणामी ठाकरे यांचे अनेक उमेदवार पडतील आणि तसे झाले तर मशालच विझेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. शरद पवारच ठाकरे गटाला संपवायला निघाले आहेत असेही बोलले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला घातक ठरणारे वक्तव्य शरद पवारांनी नेमके का केले हा प्रश्नच आहे.

महाराष्ट्राचे राजकारण आजही शरद पवारांभोवती फिरताना दिसून येत आहे. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही काँग्रेसमध्ये विलीन होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर खुलासा करताना शरद पवार म्हणाले, सहका-यांशी चर्चा केल्याशिवाय मी काहीही बोलणार नाही. आमच्या पक्षाबद्दल कोणतेही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जाईल. लोकसभा निवडणुकीनंतर देशासह महाराष्ट्राचे राजकारण नवे वळण घेईल याचे आता संकेत मिळू लागले आहेत. निवडणुका सुरू असताना आणि महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर आता शरद पवारांनी पुन्हा एकदा प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत केलेली अनेक वक्तव्ये आणि त्यांचे टायमिंग लक्षात घेता आताच्या वक्तव्याला निश्चितच काहीतरी अर्थ आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विलीनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल.

या वक्तव्याचे दोन अर्थ निघू शकतात. एक म्हणजे, पंतप्रधान मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाले तरी काँग्रेसला एकत्रीकरण आणि विलीनीकरणाची मोहीम राबवावी लागेल. दुसरे म्हणजे या निवडणुकीत मोदींना सत्ता मिळाली नाही किंवा अपेक्षित यश मिळाले नाही तरी सुद्धा काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये विलीनीकरण आणि एकत्रीकरणाची मोहीम राबवावी लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांनी कोणताही कौल दिला तरी देशातील विविध प्रादेशिक पक्ष काँगे्रसच्या झेंड्याखाली एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू होईल असेच शरद पवारांना म्हणायचे आहे असे दिसते. गत काही वर्षांपासून भाजप ज्या प्रकारचे प्रभावशाली राजकारण करत आहे त्याला तोडीस तोड उत्तर द्यायचे असेल तर काँग्रेससारख्या एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाखालीच उत्तर देणे शक्य होणार आहे याची जाणीव पुन्हा एकदा करून देण्याचे काम शरद पवारांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनीही अशाच प्रकारचे मत व्यक्त केले होते. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले तर या प्रयोगाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या कालावधीत शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता जेव्हा एखादे वक्तव्य करतो तेव्हा त्या विधानास निश्चितच खूप महत्त्व असते.

लोकसभा निवडणुकीनंतर अनेक छोटे-मोठे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले किंवा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले तर काँग्रेसची ताकद निश्चितच वाढणार आहे. काही राज्यांत काँग्रेसमधून बाहेर पडलेले प्रादेशिक पक्ष एवढे मोठे झाले आहेत की ते पुन्हा मूळ पक्षात सामील होतील असे वाटत नाही. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस हे त्याचे उदाहरण. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष, बिहारमधील लालुप्रसाद यांचा राष्ट्रीय जनता दल किंवा दक्षिण भारतातील द्रमुकसारखा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता खूपच कमी आहे पण हे पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली मात्र निश्चितच एकत्र येऊ शकतील. शरद पवारांना आपल्या मुलाखतीद्वारे हेच सुचवायचे असेल. पण शरद पवार बोलतात एक आणि करतात दुसरेच अशी त्यांची ख्याती आहे. या आधी शरद पवार आणि फडणवीस यांच्यात गुगली-चायनामनची जुगलबंदी झाली आहे. आता पवारांनी टाकलेला ‘यॉर्कर’ कुणाच्या दांड्या उद्ध्वस्त करतो ते बघायचे!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR