चारपैकी ३ जागांवर विजय, भाजपला १ जागा
श्रीनगर : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या राज्यसभेच्या ४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. चारपैकी ३ जागा जिंकत सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्सने ताकद दाखवली आहे तर भाजपला एका जागेवर यश मिळाले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप प्रमुख विरोधी पक्ष आहे.
जम्मू काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा २०१८ मध्ये रद्द करण्यात आला. यानंतर दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच राज्यसभेची निवडणूक झाली. या ऐतिहासिक निवडणुकीत भाजपविरोधक एकवटले. त्यामुळे भाजपला केवळ एक जागा जिंकता आली. राज्यात सत्ताधारी असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सने तीन जागा खिशात घातल्या. काँग्रेस, पीडीपीने नॅशनल कॉन्फरन्सला साथ दिली. त्यामुळे तिसरी जागा जिंकण्यासाठी पुरेसे संख्याबळ नसतानाही नॅशनल कॉन्फरन्सचा तिसरा उमेदवार विजयी झाला.
यात नॅशनल कॉन्फरन्सचे चौधरी मोहम्मद रमजान, सज्जाद अहमद किचलू आणि शमी ओबेरॉय यांनी विजय मिळवला तर भाजपच्या सत शर्मा यांनी बाजी मारली. त्यांना ३२ मते मिळाली. सत शर्मा जम्मू काश्मीर भाजपचे अध्यक्ष आहेत. नॅशनल कॉन्फरन्सच्या चौधरी मोहम्मद रमजान यांच्या समोर भाजपच्या अली मोहम्मद मीर यांचे आव्हान होते. मीर यांचा पराभव झाला. दुस-या जागेसाठी एनसीचे सज्जाद अहमद किचलू आणि भाजपचे राकेश महाजन आमनेसामने होते.

