37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeलातूरजळकोट तालुक्यात बीएसएनएलची सेवा तीन दिवसापासून विस्कळीत

जळकोट तालुक्यात बीएसएनएलची सेवा तीन दिवसापासून विस्कळीत

लातूर : प्रतिनिधी

निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जळकोट तालुक्यातील बीएसएनएलची सेवा गत तीन दिवसापासून विस्कळीत झालेली आहे. ना कुणाचे फोन येईनात ना इंटरनेट चालेना यामुळे ज्यांच्याजवळ बीएसएनएलचे सिमकार्ड आहे असे मोबाईल हॅन्डसेट फक्त खेळणी बनलेले आहेत. सर्वात अगोदर जळकोट तालुक्यामध्ये बीएसएनएल या सरकारी कंपनीनेच इंटरनेट सेवा सुरू केली. सुरुवातीला बीएसएनएलचे सिम कार्ड विकत घेण्याची वेळ ग्राहकावर आली. महागाचे सिम कार्ड देखील ग्राहकांनी घेतले . यानंतर इतर खाजगी कंपन्यांचा शिरकाव झाला असे असले तरी अनेक ग्राहकाजवळ आज देखील बीएसएनएलचे सिम कार्ड आहे.

मधल्या काळामध्ये बीएसएनएलची सेवा पुर्णपणे ठप्प झाली होती. वारंवार बीएसएनएल सेवा खंडित होत होती तसेच इंटरनेट सेवा देखील बरोबर येत नव्हती यामुळे ग्राहकांनी आपले बीएसएनएल कार्ड पोर्ट करून इतर खाजगी कंपन्याकडे ड्रायव्हर्ट करून घेतले. यामुळे बीएसएनएल ग्राहकांची संख्या देखील कमी झाली . आज जळकोट तालुक्यामध्ये एअरटेल सारख्या खाजगी कंपन्या ५ जी सुविधा देत आहेत. परंतु जळकोट तालुक्यामध्ये बीएसएनएल मात्र ४ जी सुविधा देखील व्यवस्थित देत नाही.

सध्या जळकोट मध्ये तीन दिवसापासून बीएसएनएलची लँडलाईन तसेच मोबाईल सुविधा देखील बंदच आहे. कधी रेंज येत आहे तर कधी रेंज गायब होत आहे. यामुळे निवडणुकीच्या धामधुमीमध्ये कार्यकर्ते तसेच नेत्यांचे मोबाईल व्यवस्थित लागेल असे झाले आहे. तसेच इतर ग्राहकांना देखील याचा फटका बसत आहे. सतत बीएसएनएल सेवा बंद राहत असल्यामुळे ग्राहकांनी याबाबत ना पसंती व्यक्त केली आहे. आपण सरकारी कंपनीचे काहीतरी देणे लागतो म्हणून अनेकांनी बीएसएनएल सिम कार्ड आपल्या मोबाईल मध्ये ठेवलेले आहे. मात्र बीएसएनएलची सेवा अशीच नेहमी बंद होत राहिल्यास अनेक ग्राहक बीएसएनएलची सेवा सोडून खाजगी कंपनीकडे जाण्याच्या तयारीत आहेत . जळकोट शहर तसेच तालुक्यामध्ये बीएसएनएलने ५ जी सेवा सुरू करावी यासोबतच वारंवार खंडित होणारी सेवा सुरळीत करावी अशी मागणी देखील जळकोट तालुक्यातील बीएसएनएलच्या ग्राहकांनी केली आहे .

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR