जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यात जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या दमदार पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना मोठा वेग आला आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील ३१ हजार ४६६ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी १२ हजार ५०५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून, ही एकूण क्षेत्राच्या सुमारे ४० टक्के आहे.
वेळेवर झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने शेतक-यांनी पेरणीच्या कामांना गती दिली आहे. उर्वरित क्षेत्रावरील पेरण्या पुढील आठवडाभरात पूर्ण होतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. तालुक्यात आतापर्यंत तूर १,७०० हेक्टर, मूग २४५ हेक्टर, उडीद १२९ हेक्टर, सोयाबीन ९,०६४ हेक्टर आणि कापूस १,३६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन पिकाचा सर्वाधिक वाटा असून शेतक-यांचा कल यंदाही या पिकाकडे असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या सोमवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर जमिनीत मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला. त्यानंतर एक दिवस विश्रांती मिळाल्याने अनेक शेतक-यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. सध्या सुरू असलेल्या रिमझिम ते मध्यम पावसामुळे पिकांच्या उगवणीस पोषक वातावरण तयार झाले आहे. मात्र, काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने दोन-चार दिवस पेरणीचे काम ठप्प झाले होते. आता पाणी ओसरल्यानंतर त्या भागातही पेरण्यांना वेग आला असून शेतकरी हे ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात पेरणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
कृषी विभागाच्या अधिका-यांनी शेतक-यांना योग्य आर्द्रता पाहून पेरणी पूर्ण करण्याचे तसेच प्रमाणित बियाणे आणि शिफारशीनुसार खतांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. यंदा मान्सूनची सुरुवात समाधानकारक झाल्याने खरीप हंगामाबाबत शेतक-यांमध्ये आशावादी वातावरण निर्माण झाले आहे.
















